मणिपूरमध्ये नितीश कुमारांच्या पक्षाला धक्का ः रालोआ सोडल्याने आमदार होते नाराज
वृत्तसंस्था/ इंफाळ
बिहारची राजधानी पाटणा येथे संयुक्त जनता दलाची शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होण्यापूर्वीच पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मणिपूरमधील संजदच्या 6 पैकी 5 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या आमदारांमध्ये के. एच. जॉयकिशन, एन. सनाते, मोहम्मद अछब उद्दीन, माजी पोलीस महासंचालक ए. एम. खाउटे आणि थांगजाम अरुण कुमार यांचा समावेश आहे.
मणिपूर विधानसभा सचिवालयाने या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती दिली आहे. संजदने मार्च महिन्यात पार पडलेल्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत 38 उमेदवार उभे केले होते, यातील 6 उमेदवार विजयी झाले होते. तर आता राज्यात संजदचा केवळ एक आमदार राहिला आहे.
संजदने रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने हे आमदार नाराज झाले होते. मणिपूरमधील भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय नितीश कुमार यांनी घेतला होता. आमदारांच्या भाजपप्रवेशाला संजदने घटनाविरोधी ठरविले आहे. तर भाजपने या आमदारांचे पक्षात स्वागत केले आहे.
बिहारला संजदमुक्त करतील लालू
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी याप्रकरणी संजदवर निशाणा साधला आहे. अरुणाचलनंतर मणिपूरही संजदमुक्त, अत्यंत लवकरच लालूप्रसाद यादव बिहारला देखील संजदमुक्त करतील, असे मोदी यांनी म्हटले आहे. अलीकडेच अरुणाचल प्रदेशातील संजदचा एक आमदार भाजपमध्ये सामील झाला होता.
संजदकडून भाजपवर आरोप
अरुणाचल प्रदेशात संजदने 7 जागा तर मणिपूरमध्ये 6 जागा जिंकल्या. या दोन्ही राज्यांमध्ये आम्ही थेटपणे भाजपला पराभूत करून विजयी झालो. 2020 मध्ये अरुणाचल प्रदेशात आमच्या 7 पैकी 6 आमदारांना भाजपने फोडले होते. मणिपूरमध्ये पैशांच्या बळावर हा प्रकार घडवून आणला गेला आहे. भाजपने कितीही प्रयत्न केला तरीही संजद 2023 मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविणार असल्याचा दावा संजदचे अध्यक्ष ललन सिंह यांनी केला आहे.









