जलसंवर्धन मंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती : ‘मंत्री तुमच्या दारी’ कार्यक्रमांतर्गत धारबांदोडा तालुक्याचा दौरा
प्रतिनिधी / धारबांदोडा
धारबांदोडा तालुक्यासाठी 5 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येईल. मात्र त्यासाठी सोयीस्कर जागा उपलब्ध झाली पाहिजे. शेती हा या भागातील मूळ व्यवसाय असल्याने त्याला चालना देण्यासाठी ग्रामीण भागातील जलस्रोतांचा परिणामकारक वापर करून कृषी उत्पादनाला गतिमान करण्याची सरकारची योजना आहे, अशी माहिती जलसंवर्धनमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.
‘मंत्री तुमच्या दारी’ या कार्यक्रमाचा भाग म्हणून मंत्री सुभाष शिरोडकर यांनी नुकतीच धारबांदोडा तालुक्याला भेट दिली. तालुका मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध खात्यांचे अधिकाऱयांशी चर्चा करून प्रशासकीय कामाचा आढावा घेतला. तसेच या दौऱयाच्यावेळी विविध पंचायतींचे सरपंच, पंचसदस्य व नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर, जलसंवर्धन खात्याचे मुख्य अभियंते प्रमोद बदामी, धारबांदोडय़ाचे उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकर, मामलेदार लक्ष्मीकांत कुर्टीकर, सहकार निबंधक विशांत गावणेकर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, धारबांदोडा जिल्हा पंचायत सदस्य सुधा गावकर, धारबांदोडाचे सरपंच विनायक गांवस आदी उपस्थित होते.
धारबांदोडा तालुक्यात 500 नवीन शेतकरी तयार करण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार असून शेतीला पाण्याचा तुटवडा भासणार नाही याची आम्ही पूर्ण खबरदारी घेऊ, असेही मंत्री शिरोडकर यांनी यावेळी जाहीर केले. दूधसागर नदीतून गेल्या काही महिन्यापासून गढूळ पाणी येत असल्याने ते नेमके कुठून येते याची चौकशी करण्याची मागणी सरपंच विनायक गांवस, सुवर्णा तेंडुलकर व दाभाळ पंचायतीचे उपसरपंच कालिदास गांवकर यांनी केली. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मामलेदार, जलसंवर्धन खात्याचे अभियंते तसेच काले, दाभाळ व धारबांदोडा पंचायतीचे सरपंच यांची समिती नियुक्त करून अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्री शिरोडकर यांनी दिले.
आमदार गणेश गावकर यांनी सर्वांनी एकसंघ राहून व परस्परांच्या सहकार्याने काम केल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील, असे सांगितले. यावेळी साकोर्डा पंचायतीचे उपसरपंच शिरीष देसाई, कुळेचे सरपंच गोविंद शिगांवकर, मोलेचे सरपंच कपिल नाईक, धारबांदोडय़ाचे सरपंच विनायक गांवस, दाभाळचे उपसरपंच कालिदास गांवकर यांनी आपापल्या पंचायत क्षेत्रातील विविध समस्या मंत्री शिरोडकर यांच्यापुढे मांडल्या. या भेटीदरम्यान मंत्री शिरोडकर यांनी दूधसागर नदीची पाहणी केली व मोले येथील शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन केले.









