वृत्तसंस्था/ पॅरिस (फ्रान्स)
येथे झालेल्या 2023 च्या विश्वचषक तिरंदाजी स्टेज 4 स्पर्धेत भारताने एकूण 5 पदके मिळविली आहेत. त्यामध्ये 2 सुवर्ण आणि 3 कास्यपदकांचा समावेश आहे. भारतीय महिला तिरंदाजपटूंनी या स्पर्धेत महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळविले. आदिती गोपीचंद स्वामी, ज्योती सुरेखा वेनाम, परनीत कौर यांनी या क्रीडाप्रकारात दर्जेदार कामगिरी केली आहे. बर्लिनमध्ये झालेल्या विश्व तिरंदाजी चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताच्या या महिला त्रिकुटाने सुवर्णपदक मिळविले होते.
पॅरिसमधील झालेल्या या स्पर्धेत ओजस प्रवीण देवतळे, प्रथमेश जावकर आणि अभिषेक वर्मा या तिरंदाजपटूंनी पुरूषांच्या सांघिक कंपाऊंड प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याचप्रमाणे भारतीय पुरूष आणि महिला तिरंदाजपटूंनी बर्लिनमधील स्पर्धेत आपल्या देशाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. पॅरिसमधील स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी पुरूष आणि महिलांच्या सांघिक रिकर्व्ह प्रकारात कास्यपदके मिळविली आहेत. ज्योती सुरेखा वेनामने वैयक्तिक गटात एकमेव कास्यपदक मिळविले आहेत. पुरूषांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात बर्लिनमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या ओजस देवतळेला वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात लवकर बाद व्हावे लागले.