वृत्तसंस्था/ अलपुझा
केरळमध्ये सोमवारी रात्री उशिरा भीषण रस्ते दुर्घटना घडली असून यात एमबीबीएसच्या 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अलपुझा जिल्ह्dयात एक भरधाव कार राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या बसला धडकली होती. कारमधून 7 विद्यार्थी प्रवास करत होते, यातील 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. टक्कर अत्यंत भीषण असल्याने कारचा चेंदामेंदा झाला आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना कटरचा वापर करावा लागला आहे.
वंदनम वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकणारे हे विद्यार्थी होते. 5 पैकी तीन विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोन जणांचा मृत्यू रुग्णालयात हलवताना झाला आहे. जखमी विद्यार्थ्यांना अलप्पुजा वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. मोहम्मद, मुहासिन, इब्राहिम, देवानंद आणि श्रीदीप अशी मृत विद्यार्थांची नावे असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कार एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना बसला जाऊन धडकली होती. याप्रकरणी अधिक तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.









