कुपवाडामध्ये सुरक्षा दलाला मोठे यश
वृत्तसंस्था /श्रीनगर
भारतीय सुरक्षा दलांनी गुऊवारी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला. एलओसीवर सुरक्षा दलांनी मोठ्या कारवाईत लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत या भागात शोधमोहीम सुरू असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे गुरुवारी सकाळी माछिल सेक्टरमध्ये जम्मू काश्मीर पोलिसांनी लष्करासोबत संयुक्त कारवाई सुरू केली होती. या भागात दहशतवाद्यांच्या एका गटाकडून घुसखोरीच्या संभाव्य प्रयत्नाची माहिती गोपनीय सूत्रांनी जम्मू-काश्मीर पोलिसांना दिली होती. तसेच गुप्तचर विभागाने सुरक्षा दलांना सतर्क केले होते. या कारवाईदरम्यान सहा तासांच्या ऑपरेशननंतर एकूण पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले.
सीमेच्या कुंपणाजवळ सतर्क जवानांनी घुसखोर गटाचा माग काढत त्यांना आव्हान देताच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. यानंतर चकमक झाली. सैनिकांनी केलेल्या सुऊवातीच्या गोळीबारात दोन घुसखोर मारले गेले. तर काहींनी पोबारा करण्याचा प्रयत्न केला. तथापि, सुरक्षा दलाने फरार दहशतवाद्यांचा माग काढण्याचा आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न दिवसभर सुरूच ठेवला. अखेर सहा तासांच्या प्रदीर्घ कारवाईनंतर आणखी 3 दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात आले. जम्मू काश्मीर पोलीस दलाच्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवरून या कारवाईची माहिती देण्यात आली आहे. कुपवाडातील मोहिमेदरम्यान दुपारनंतर तीन दहशतवादी मारले गेल्याने एकूण मृत दहशतवाद्यांचा आकडा पाच झाल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली. या सर्व दहशतवाद्यांची ओळख पटवली जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. तथापि, सुरुवातीच्या टप्प्यात त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. यापूर्वी 10 ऑक्टोबर रोजी शोपियान जिह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. शोपियान परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केल्यानंतर अलीस्पोरा येथे चकमक झाली होती.









