जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विवेकराव पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : लम्पिस्कीनमुळे जिल्ह्यात 7 हजारांहून अधिक जनावरे मृत झाली आहेत. परिणामी दूध उत्पादन कमी झाले. दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील दूध उत्पादक सोसायट्यांना 5 लाखांची रक्कम विनाव्याज देण्यात येईल. या सोसायटी त्यांनी निवडलेल्या पात्र शेतकऱ्याला 50 हजार रुपये रक्कम जनावर खरेदीसाठी देतील. जेणेकरून जिल्ह्यात पुन्हा दूध उत्पादन पूर्ववत होईल, अशी माहिती बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विवेकराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, लम्पिस्कीन व अन्य चर्मरोग झाल्याने शेतकऱ्यांनी आपली जनावरे विक्रीस काढली. याचा परिणामसुद्धा दूध उत्पादनावर झाला आहे. बेळगाव जिल्हा हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. मात्र येथील शेतकऱ्यांची जनावरे दगावल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. दुभती जनावरे म्हणजेच गायी-म्हशी खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपये व्याजरहित कर्ज स्वरुपात दिली जाईल. शेतकऱ्यांना दिलासा म्हणून हा पर्याय आम्ही निवडला आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी भेसळयुक्त दूध वितरित केले जाते. मात्र याबाबत कारवाई होत नाही. भेसळयुक्त दूध उत्पादन करणाऱ्यांची एक लॉबी झाली आहे. त्यांच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार आमचा नाही. त्यामुळे माध्यमांमधूनच त्याबाबत जागृती होणे आवश्यक आहे. यावेळी केएमएफचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, भेसळयुक्त दूध हे सर्वांच्याच आरोग्यासाठी घातक आहे. याबाबत आम्ही संबंधित खात्याला माहिती दिली तरी कारवाई होत नाही. जे अधिकारी कठोरपणे कारवाई करतात त्यांची बदली केली जाते. त्यामुळे भेसळयुक्त दुधाचे दुष्टचक्र भेदणे अशक्य झाले आहे. याबाबत सरकारकडेसुद्धा आम्ही माहिती पाठविली आहे.
तिरुपती बालाजी देवस्थानला तूप पुरविण्याबाबत लवकरच निर्णय
शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्यांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू करण्यात येत आहे. येथे फक्त मुलींना प्रवेश द्यावा की मुला-मुलींना प्रवेश द्यावा, याबद्दल चर्चा सुरू आहे. लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल. तिरुपती बालाजी देवस्थानला तूप पुरविण्याबाबत विचारणा करता दरामध्ये फरक आल्याने आम्ही हा करार मान्य केला नाही. मात्र देवस्थानचे कार्यकारी संचालकांनी पुन्हा चर्चेची तयारी दर्शविल्याने लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. बेळगाव शहरात नंदिनी दुधाची 206 आऊटलेट्स असून त्यापैकी 150 आऊटलेटस्मध्ये फक्त नंदिनी उत्पादने विक्रीस आहेत. केएमएफमध्ये दररोज 70 लाख लिटर दूध उत्पादन होते. तसेच गोवा आणि पुण्यालासुद्धा दूध पाठविले जाते, अशी माहिती त्यांनी दिली.









