वार्ताहर/अगसगे
गेल्या पंधरा दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अगसगे गावामध्ये दररोज घरांची पडझड सुरूच आहे. बुधवार दि. 31 रोजी धाकलूबाई लक्ष्मण चौगुले यांचे घर कोसळून सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले. गावातील लक्ष्मी गल्लीमध्ये घर आहे. सध्या सुरू असलेल्या संततधारेमुळे बुधवारी रात्री अकराच्या सुमारास घरच्या भिंतीच्या मातीचे कण पडत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीय बाहेर धावून आले. बघता बघता घराच्या भिंती पडू लागल्या. त्यामुळे घरातील दैनंदिन साहित्य सायकल, भांडी, तांदूळ, जोंधळे यासह शेती उपयुक्त अवजारे आणि घरामध्येच असलेले शौचालय मातीच्या ढिगाऱ्याखाली गेले आहे. त्यामुळे या कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जनावरे किरकोळ जखमी
घरामध्ये चार म्हशी होत्या. मात्र भिंत कोसळल्याने छताची लाकडे मध्येच अडकली व काही लाकडे जनावरांच्या अंगावर पडली. त्यामुळे जनावरे देखील किरकोळ जखमी झाली आहेत. नागरिकांच्या सहाय्याने जनावरे बाहेर काढण्यात आली. पशुवैद्याकडून जनावरांना उपचार करण्यात आले. या घटनेविषयी समजताच ग्रा.पं. अध्यक्ष अमृत मुद्देन्नावर व सदस्य अप्पयगौडा पाटील, गुंडू कुरेन्नावर यानी पाहणी केली असून घरासंबंधी व इतर कागदपत्रे पंचायतीकडे देण्याचे आवाहन केले. नुकसान भरपाईसाठी संबंधित खात्याकडे अहवाल पाठविण्याचे आश्वासन दिले.









