भारतीयांना होणार मोठा लाभ
वृत्तसंस्था / ओटावा
कॅनडाने देशात प्रवेश करणाऱया स्थलांतरितांच्या संख्येत वाढ करण्यासाठी एक नवी योजना सादर केली आहे. कॅनडामध्ये सध्या मनुष्यबळाची टंचाई निर्माण झाली आहे. 2025 पर्यंत दरवर्षी 5 लाख स्थलांतरितांना देशात प्रवेश देण्याची योजना कॅनडाने आखली आहे. कॅनडामध्ये भारतीय स्थलांतरितांची संख्या अधिक आहे. याचमुळे तेथील सरकारच्या या निर्णयाचा लाभ भारतीयांना मोठय़ा प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.
शरणार्थी, इमिग्रेशन आणि नागरिकत्व मंत्री सीन प्रेजरने एक नवी योजना जारी केली आहे. यात परिवाराचे सदस्य आणि शरणार्थी तसेच आवश्यक कार्य कौशल्य आणि अनुभवी लोकांसह अधिक स्थायी रहिवाशांना स्वीकारण्यावर भर देण्यात आला आहे. देशातील विरोधी पक्ष असलेल्या कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीने या योजनेला समर्थन दर्शविले आहे.
कॅनडात अधिक लोक दाखल झाल्याने अर्थव्यवस्थेला लाभ होणार असल्याचे प्रेजर यांनी म्हटले आहे. नव्या योजनेच्या अंतर्गत 2023 मध्ये 4,65,000 लोकांना देशात प्रवेश दिला जाणार आहे. 2025 पर्यंत हा आकडा वाढून 5 लाख होणार आहे. इमिग्रेशन विभागानुसार मागील वर्षी 4,05,000 लोकांना स्थायी रहिवासी म्हणून प्रवेश देण्यात आला होता.
स्थलांतरितांना अधिक प्रमाणात प्रवेश देण्यात आल्याने विविध क्षेत्रांमध्ये रिक्त असलेल्या सुमारे 10 लाख पदांवर भरती करता येईल अशी अपेक्षा सरकारला वाटत आहे. कॅनडात रोजगाराच्या लाखो संधी आहेत. स्थलांतरित यापूर्वीच प्रत्येक क्षेत्रात योगदान देत आहेत. स्थलांतरितांना न स्वीकारता आम्ही आमच्या आर्थिक क्षमता वाढवू शकत नसल्याचे मंत्री प्रेजर यांनी म्हटले आहे.









