कंपनीच्या वार्षिक बैठकीत निर्णय ः गौतम अदानी यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी हे एनर्जी (ऊर्जा) क्षेत्रात जवळपास 70 अब्ज डॉलर्स म्हणजे 5.59 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत, अशी माहिती कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत गौतम अदानी यांनी दिली आहे.
अदानी यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे, की आमचा ग्रुप ग्रीन हायड्रोजनला भविष्यातील इंधन बनविण्याच्या दिशेने काम करत असून याला आगामी काळात मूर्तरुप देणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. यामुळे आमचा समूह भारताला ऑईलच्या निव्वळ आयातीमधून ग्रीन हायड्रोजन निर्यातीमध्ये बदलण्यावर सर्वात पुढे राहणार आहे. तसेच यासाठीच ही गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
समूहाचा विकास हा देशाचा विकास ः अदानी
अदानी समूहाची यशस्वी वाटचाल ही देशाच्या विकासाच्या प्रवासासोबत जोडली जाणार आहे. तसेच चालू वर्षात अदानी समूहाचे बाजारमूल्य 200 अब्ज डॉलर्स म्हणजे (15.96 लाख कोटी रु.) इतके वाढल्याचेही अदानी यांनी स्पष्ट केले.
रिन्यूएबल एनर्जीची क्षमता 300 टक्क्यांनी वाढली
वर्ष 2015 नंतर भारताची रिन्यूएबल एनर्जी क्षमता जवळपास 300 टक्क्यांनी वाढली आहे. यासह जगात आपल्यासारखे काही कमीच देश आहेत, की ज्यांनी कोरोना व ऊर्जा संकटातही आपले रिन्यूएबल एनर्जीतले योगदान वेगवान केले आहे, असे प्रतिपादन अदानी यांनी बैठकीदरम्यान केले.
सिमेंट व्यवसायातही उतरणार
होल्सिम यांच्या भागीदारीसोबत अदानी सिमेंट व्यवसायातही पाय ठेवणार असल्याची माहिती आहे. यासोबतच डाटा केंद्र, डिजिटल सुपर ऍप आणि इंडस्ट्रीयल क्लाउडसह डिफेन्स व एयरोस्पेस, धातू आणि मटेरियल आदीमध्ये उतरणार असल्याची माहिती कंपनीने दिली.









