निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन, 2047 पर्यंत होणार 30 लाख कोटी डॉलर्स
वृत्तसंस्था /गांधीनगर
भारताचा विकासदर आज जगात सर्वात अधिक असून येत्या चार वर्षांमध्ये आमची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलर्सचा आकार धारण करणार आहे. तसेच 2047 पर्यंत आम्ही 30 लाख कोटी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेची पायरी गाठणार आहोत, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे.
येथे आयोजित ‘व्हायब्रंट गुजरात’ शिखर संमेलनात त्या भाषण करीत होत्या. या संमेलनाला जगातील 34 देशांचे नेते उपस्थित आहेत. तसेच अनेक औद्योगिक संस्थांचे अधिकारीही या संमेलताना सहभागी झालेले आहेत. हे संमेलन 12 जानेवारीपर्यंत चालणार आहे. त्यात अनेक करार होण्याची शक्यता आहे.
गुंतवणुकीसाठी आकर्षक स्थान
सध्या भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न 3.4 लाख कोटी डॉलर्स इतके आहे. तसेच सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी हे चारच देश सध्या भारताच्या पुढे आहेत. येत्या तेवीस वर्षात भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होणार असून या ‘अमृतकाला’त भारताची अर्थव्यवस्था 30 लाख कोटी डॉलर्सची मर्यादा गाठणार आहे. केल्या 10 वर्षांमध्ये अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक व्यवहारी निर्णय घेण्यात आले असल्याने भारत हे विदेशी गुंतवणुकीसाठी अत्यंत अनुकूल स्थान ठरले आहे. परिणामी विदेशी गुंतवणुकीत वेगाने वाढ होत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
उगवत्या उद्योगांना प्राधान्य
येत्या दोन दशकांमध्ये भारताने उगवत्या उद्योगांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानालाही प्रथम स्थान देण्यात येणार आहे. हे तंत्रज्ञान भारतात विकसित करण्यावर भर राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने थेट विदेशी गुंतवणुकीला अधिकाधिक प्रमाणात आकर्षित करण्यासाठी धोरणे आखली आहेत, ही बाब त्यांनी नमूद केली.
600 अब्जाची गुंतवणूक
गेल्या 9 वर्षांमध्ये भारतात जवळपास 600 अब्ज डॉलर्सची (595 अब्ज डॉलर्स) थेट विदेशी गुंतवणूक आली आहे. हा केंद्र सरकारच्या धोरणांचाच परिणाम आहे. एवढ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक इतक्या कालावधीत यापूर्वी कधीही आलेली नाही. भारताकडे आता जगाचे लक्ष वेधले गेले असून भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, ही बाब स्पष्ट होते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कोरोनाच्या आव्हानाचा स्वीकार
कोरोनाचा उद्रेक हा भारताप्रमाणेच जगाच्या अर्थव्यवस्थेवरचे मोठे संकट होते. तथापि, भारताच्या जनतेने या आव्हानाचा मोठ्या धीराने आणि खंबीरतेने स्वीकार केला. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बळ मिळाले. तसेच नंतरच्या काळात अर्थव्यवस्थेने कोरोना काळातील उणीव भरुन काढत मोठी झेप घेतली आहे. जनतेच्या सहकार्यामुळे अर्थव्यवस्थेचा पाया त्याही काळात भक्कम राहिला. आता त्यावरुन आम्ही प्रगती करीत आहोत, अशी स्थिती त्यांनी स्पष्ट केली.
गुजरातची प्रशंसा
गुजरातची लोकसंख्या देशाच्या लोकसंख्येच्या पाच टक्के आहे. तथापि देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात या राज्याचा वाटा 8.5 टक्के इतका आहे. 2011 ते 2021 या कालावधीत गुजरातचा विकास दर 12 टक्के राहिला. याच कालावधीत देशाचा विकासदर 10 टक्के होता असेही त्यांनी दृष्टीस आणून दिले.









