आठ तास चकमक : दहशतवाद्यांनी स्फोट घडवून सुरक्षा दलाला केले टार्गेट
► वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये शुक्रवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत लष्कराचे पाच जवान हुतात्मा झाले आहेत. तब्बल आठ तासांहून अधिक वेळ चाललेल्या चकमकती सकाळच्या सत्रात दोन जवान हुतात्मा झाल्याचे वृत्त होते. मात्र, सायंकाळच्या सुमारास गंभीर जखमी झालेल्या आणखी तीन जवानांनी अखेरचा श्वास घेतल्याने हुतात्म्यांचा आकडा पाच झाला आहे. या चकमकीत अन्य एक जवान जखमी झाला आहे. दरम्यान, ‘पीएएफएफ’ या दहशतवादी संघटनेचा या संघर्षातील सहभाग निश्चित मानला जात आहे.
गोव्यातील पणजी येथे सुरू असलेल्या एससीओ बैठकीपूर्वी राजौरीतील चकमक सुरू झाली. या बैठकीत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो सहभागी झाले असून त्यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचीही भेट घेतली. पूंछमध्ये लष्कराच्या ट्रकवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांनी राजौरीमध्ये आश्रय घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी त्यांना घेरले. सकाळी साडेसात वाजता सुरू झालेली चकमक 8 तासांहून अधिक काळ सुरू होती. सुऊवातीला लष्कराने 2-3 दहशतवाद्यांना घेरले असल्याचे सूत्रांनी सांगितले. सुरक्षा दलांचा सुगावा लागताच दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. या संघर्षादरम्यान दहशतवाद्यांनी स्फोट केल्यामुळे सुरक्षा दलाला मोठा दगाफटका सहन करावा लागला. ‘पीएएफएफ’ संघटनेने सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर कोणत्याही अफवा पसरू नयेत म्हणून सावधगिरीसाठी राजौरीमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
लष्कराने गेल्या दोन दिवसांपूर्वीच राजौरीतील मोहीमेची तयारी सुरू केली होती. राजौरीतील जंगलभागात दहशतवादी असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी पहाटेपासून शोधमोहीम व्यापक करण्यात आली. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू झाला. दहशतवादी एका गुहेत लपून बसले होते. ज्या भागात दहशतवादी लपले आहेत त्या भागात मोठ्या प्रमाणात झाडी आणि डोंगर आहेत. घनदाट जंगलभागामुळे चकमकीत बराच व्यत्यय येत होता. या कारवाईक काही दहशतवादीही मारले गेल्याचा दावा लष्कराकडून करण्यात आला. मात्र, जीवितहानीचा निश्चित आकडा तातडीने जाहीर करण्यात आलेला नाही.
72 तासांत 4 दहशतवादी ठार
काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसात तीन ते चार मोठ्या चकमकी झाल्या आहेत. शुक्रवारी सकाळी राजौरीमधील कंडी भागात झालेल्या चकमकीपूर्वी गुऊवारी अनंतनाग जिह्यातील बिजबेहारा भागात गुऊवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या हल्ल्यात एक सुरक्षा कर्मचारी किरकोळ जखमी झाला असून त्याला ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी काश्मीर टायगर्सने घेतली होती. या हल्ल्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक सैनिक जखमी झाले आहेत. काश्मीर टायगर्स अशा आणखी हल्ल्यांची योजना आखत आहेत.
बारामुल्ला येथे गुऊवारी सकाळी वानीगम पायीन व्रेरी भागात सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले. सुरक्षा दलांना या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तेथे शोधमोहीम राबवण्यात आली. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर चकमक सुरू झाली. तत्पूर्वी, बुधवारीही माछील सेक्टरमध्ये जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराने संयुक्त कारवाईदरम्यान दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.









