पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन एकेरीत, सात्विक-चिराग पुरुष दुहेरीत, शरथ-अकिला मिश्र दुहेरी टेटे विजेते
बर्मिंगहम / वृत्तसंस्था
येथील राष्ट्रकुल स्पर्धेतील शेवटच्या दिवशी भारताने 5 सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम गाजवला. यात पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन यांनी बॅडमिंटन एकेरी, सात्विक-चिराग यांनी बॅडमिंटन पुरुष दुहेरी, शरथने पुरुष एकेरीत व अकुलासह मिश्र दुहेरी टेटे इव्हेंटमध्ये सुवर्णपदके जिंकली. याशिवाय, बॉक्सर सागर अहलावतने रौप्य जिंकले तर पुरुष हॉकीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर भारतीय संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अन्य इव्हेंटमध्ये किदाम्बी श्रीकांतने बॅडमिंटन पुरुष एकेरीत, जी. साथियनने टेटे पुरुष एकेरीत, त्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद यांनी बॅडमिंटन महिला दुहेरीत तर पल्लिकल-घोशाल यांनी स्क्वॅश मिश्र दुहेरीत कांस्यपदकांवर आपली मोहोर उमटवली.
सुपरस्टार पीव्ही सिंधू व युवा आश्वासक खेळाडू लक्ष्य सेन यांनी बॅडमिंटन एकेरीत विश्वास सार्थ ठरवत सुवर्णपदके जिंकली. भारताची आयकॉन बॅडमिंटनपटू, जागतिक क्रमवारीतील सातव्या मानांकित सिंधूने कॅनडाच्या मिशेले लि हिच्याविरुद्ध 21-15, 21-13 अशा सरळ फरकाने बाजी मारली.
त्यानंतर दिवसभरातील अन्य एका लढतीत लक्ष्य सेनने पिछाडी भरुन काढत मलेशियाच्या 42 व्या मानांकित एन्गे झे याँगविरुद्ध 19-21, 21-9, 21-16 अशा फरकाने विजय खेचून आणला. या सामन्यातील प्रत्येक मोक्याच्या क्षणी लक्ष्य सेन पिछाडीवर होता. पण, या प्रतिकूल स्थितीतही त्याने यश खेचून आणले. सेनने 16-19 अशा फरकाने पिछाडीवर असताना ही आघाडी 18-19 अशी कमी केली. पण, अंतिमतः याँगने यात 19-21 अशी बाजी मारली.
दुसऱया गेममध्ये सेन एकवेळ मध्यंतराला 11-9 फरकाने आघाडीवर होता. त्यानंतर दुसऱया सत्रात याँगविरुद्ध फासे पलटवण्यात त्याला यश मिळाले. दुसरा गेम 21-9 अशा एकतर्फी फरकाने जिंकल्यानंतर तिसऱया गेममध्येही 21-16 असा विजय मिळवत त्याने सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली.
पीव्ही सिंधूचा दमदार विजय
महिला एकेरीत पीव्ही सिंधूने 30 वर्षीय मिशेलेविरुद्ध दोन गेम्समध्ये सहज विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये मिशेलेने 2019 वर्ल्ड चॅम्पियन सिंधूविरुद्ध 2014 राष्ट्रकुलमध्ये विजय मिळवला होता. येथे मात्र सिंधूने तिचे आव्हान 21-15, 21-13 असे सहज परतावून लावले. सिंधूने पहिल्या गेममध्ये आक्रमक फटक्यांवर जोरदार वर्चस्व गाजवले तर दुसऱया गेममध्ये मध्यंतरापर्यंत 11-6 अशी एकतर्फी आघाडी मिळवत नंतर त्याचे विजयात रुपांतर केले. ‘मी या विजयाची प्रदीर्घ प्रतीक्षा करत होते आणि आज ती प्रतीक्षा फळाला आली. येथील चाहत्यांचा देखील या विजयात मोलाचा वाटा आहे’, असे पीव्ही सिंधू जेतेपदानंतर म्हणाली.

किदाम्बी श्रीकांतला कांस्य
किदाम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीचे कांस्यपदक पटकावले. त्याने प्ले-ऑफ सामन्यात सिंगापूरच्या जिया हेंग तेहविरुद्ध 21-15, 21-18 असा विजय मिळवला. दुसऱया गेममध्ये जियाने जोरदार संघर्ष साकारला असला तरी त्याला याचे गुणात रुपांतर करता आले नाही.
महिला दुहेरीत त्रिसा-गायत्रीला कांस्य
त्रिसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीत कांस्यपदकाची कमाई केली. या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या वेंडी सुआन चेन व सॉमरव्हिले यांच्याविरुद्ध 21-15, 21-18 असा विजय मिळवला.

टेटे मिश्र दुहेरीत शरथ-अकुला विजेते, शरथ एकेरीतही सुवर्णजेता
भारतीय टेटे लिजेंड अचंथा शरथ कमल व श्रीजा अकुला यांनी मिश्र दुहेरीचे सुवर्ण पटकावले. या जोडीने मलेशियाच्या जॅव्हेन च्यूंग व कॅरेन लिन यांच्याविरुद्ध 11-4, 9-11, 11-5, 11-6 अशा फरकाने सहज विजय मिळवला. याशिवाय, शरथ पुरुष एकेरीतही सुवर्णजेता ठरला.
शरथने एकेरीच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डविरुद्ध 11-13, 11-7, 11-2, 11-6, 11-8 अशा 4-1 फरकाने विजय मिळवत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. पहिला गेम गमवावा लागला असला तरी शरथने पुढील सलग चार गेम्समध्ये उत्तम वरचष्मा गाजवला. पिचफोर्डने चौथ्या गेममध्ये जोरदार प्रयत्न केले. मात्र, यात त्याला यश आले नाही.
पुरुष दुहेरीत रौप्य
दिवसाच्या प्रारंभी, शरथ व जी. साथियन यांना पुरुष दुहेरीत इंग्लंडच्या ड्रिंकहॉल व पिचफोर्ड या जोडीविरुद्ध 11-8, 8-11, 3-11, 11-7, 4-11 अशा फरकाने पराभव पत्करावा लागल्यानंतर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. एकेरी अंतिम फेरीत स्थान निश्चित केले, त्याचवळी शरथचे किमान रौप्य निश्चित झाले होते. यासह त्याची राष्ट्रकुल पदकांची संख्या 13 वर पोहोचली. अकुलासाठी तिचे हे पहिलेवहिले राष्ट्रकुल पदक ठरले.

जी.साथियनला कांस्य
तत्पूर्वी जी. साथियनने इंग्लंडच्या पॉलचा 4-3 असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. कांस्यपदकाच्या या प्ले-ऑफ लढतीत साथियनने 11-9, 11-3, 11-5, 8-11, 9-11, 10-12, 11-9 अशा निसटत्या फरकाने विजय मिळवला. या विजयासह साथियन बर्मिंगहम राष्ट्रकुलमध्ये भारताचा 58 वा पदकजेता व 23 वा कांस्यजेता ठरला.

मुष्टियोद्धा सागर अहलावतला रौप्य
भारतीय मुष्टियोद्धा सागर अहलावतने पुरुषांच्या 92 किलोवरील वजनगटात रौप्यपदकाची कमाई केली. सागरला अंतिम फेरीत इंग्लंडच्या ओरिविरुद्ध 0-5 अशा एकतर्फी फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.
येथील अंतिम लढतीत सागरने वास्तविक जोरदार सुरुवात केली होती. मात्र, इंग्लिश प्रतिस्पर्धी ओरिने त्यानंतर जोरदार ठोसे लगावले आणि यातून सागर सावरु शकला नाही. दुसऱया फेरीत ओरिने सहज गुण मिळवत सामन्यासह सुवर्णपदकही जिंकले.

स्क्वॅश मिश्र दुहेरीत पल्लिकल-घोशाल कांस्यविजेते
मिश्र दुहेरीतील स्टार जोडी सौरभ घोशाल व दीपिका पल्लिकल यांनी भारताला स्क्वॅशमधील दुसरे पदक मिळवून दिले. कांस्यपदकासाठी झालेल्या प्ले-ऑफ लढतीत घोशाल व पल्लिकल यांनी डॉना लॉबन व कॅमेरुन पी. या ऑस्ट्रेलियन जोडीचा 11-8, 11-4 असा पराभव केला. सौरभ-दीपिका यांनी यापूर्वी 2018 गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती.
सांगता सोहळय़ात शरथ कमल, निखत झरीनकडे भारताचे नेतृत्व

स्टार पॅडलर शरथ कमल व वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीन राष्ट्रकुल स्पर्धेच्या सांगता सोहळय़ात भारतीय पथकाचे नेतृत्व करतील. 40 वर्षीय शरथ कमलने यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत 4 पदके जिंकली असून झरीनने देखील रविवारी लाईट फ्लायवेट इव्हेंटमध्ये 50 किलोग्रॅम वजनगटात सुवर्णपदक कमावले होते.









