वाहनांना बाजू देताना अपघाताची शक्यता : निकृष्ट काम केल्याचा ग्रामस्थांचा आरोप
न्हावेली / वार्ताहर
पाडलोस मडुरा रस्त्यावरील पाडलोस केणीवाडा येथे रस्त्याच्या बाजूला सुमारे पाच फुटी भगदाड पडले आहे. रात्री अपरात्री वाहनास बाजु देताना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तत्काळ लक्ष देत अपघातापूर्वी धोकादायक भगदाड बुजविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. पाडलोस केणीवाडा डोंगराचीकोण येथे बांद्याच्या दिशेने उजव्या बाजूला पाच फुटी भगदाड पडले. मान्सूनपूर्व पावसाने साईड पट्टीच्या केलेल्या कामाचा दर्जा उघडा पाडला. दगड व मातीच्या साह्याने साईड पट्टीचे काम करण्यात आले परंतु ते निकृष्ट ठरल्यामुळेच भगदाड पडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या ठिकाणी मोरीपूल असल्यामुळे वाहनांना बाजू देताना वाहन पाच फुटी भगदाडामध्ये जाण्याची शक्यता आहे. नवख्या वाहन चालकाला तर भगदाडाचा अंदाज सुद्धा येऊ शकत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तत्काळ लक्ष देत अपघात होण्यापूर्वी भगदाड बुजविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अपघात झाल्यास जबाबदार कोण?
केणीवाडा डोंगराची कोण येथे पडलेल्या भगदाडामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण राहणार? संबंधित अधिकारी की ठेकेदार असा सवाल पाडलोस शिवसेना (ठाकरे गट) शाखाप्रमुख महेश कुबल यांनी केला आहे.









