Tasgaon : तासगाव तालुक्यातील कुमठे येथे शुक्रवारी बाळासाहेब भूपाल लोहार यांच्या द्राक्ष बागेत तब्बल पाच फूट लांबीची घोणस आढळून आली. सर्प मित्र गजानन जाधव यांनी या घोणसला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. विषारी साप पाहून घाबरून न जाता सर्पमित्रांना जरूर संपर्क करा असे आवाहन यावेळी सर्प मित्र गजानन जाधव यांनी केले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, तासगाव तालुक्यातील कुमठे येथील बागेत तुकाराम लोहार व महादेव लोहार दुपारच्या दरम्यान हे दोघे भाऊ औषध फवारणी करीत होते. त्यावेळी बागेच्या कडेला गुडघ्याच्या उंचीच्या गवतातून कुकरच्या शिट्टी प्रमाणे आवाज येत होता.जाणकार ग्रामस्थांनी हा आवाज घोणस जातीच्या सर्पचा असल्याचे खात्रीलायक सांगितले.यानंतर तात्काळ बुधगाव येथील सर्प मित्र गजानन जाधव यांना बोलावण्यात आले.त्यांनी ताबडतोब घटनास्थळी येऊन घोणस पकडली.ही मादी घोणस असून तिची उंची पाच फूट तर वजन अंदाजे पाच ते सहा किलो असल्याचे सर्प मित्र जाधव यांनी सांगितले.
घोणस हा भारतात आढळणाऱ्या अतिविषारी सर्पाच्या जाती मधील सर्प आहे.शिट्टी प्रमाणे हा सर्प आवाज करतो.आपल्या परिसरात कोणताही सर्प आढळल्यास त्यास मारू नका.त्यास सुरक्षित पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यासाठी सर्पमित्रांना जरूर संपर्क करा असे आवाहन सर्प मित्र गजानन जाधव यांनी केले आहे.








