दापोली :
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील एका हॉटेलमधून पुरवठा विभागाने घरगुती वापराचे ५ सिलिंडर नुकतेच जप्त केले आहेत. यामुळे घरगुती सिलिंडर व्यावसायिक कामाकरिता वापरणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
दापोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात असणाऱ्या हॉटेलमध्ये व्यावसायिक कारणाकरिता घरगुती गॅस सिलिंडर वापरण्यात येत असल्याची माहिती दापोलीतील ज्येष्ठ पत्रकाराला मिळाली. त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता त्यांना या हॉटेलमध्ये घरगुती वापराचे ५ गॅस सिलिंडर आढळून आले.
त्यांनी तत्काळ महसूल अधिकाऱ्याना घटनास्थळी पाचारण केले. महसूल पुरवठा निरीक्षक अधिकारी रवी इढोळे व पुरवठा निरीक्षक ओंकार राणे यांनी तात्काळ घटनास्थळी येत हे सदर ५ गॅस सिलिंडर हॉटेलमधून जप्त केले.
हे ५ गॅस सिलिंडर हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या दापोलीतील एका गॅस एजन्सी येथून या हॉटेलला पुरवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. हे सर्व गॅस सिलिंडर पंचनामा करून पुरवठा विभागाने त्या गॅस एजन्सीच्या ताब्यात दिले आहेत.
याप्रकरणी हॉटेल मालक यांनी आपल्या जबाबात आपल्या कामगार लोकांच्या घरचे सिलिंडर आपण त्यांना भरून देण्याकरिता आणले होते असा जबाब दिल्याचे पुरवठा विभागाने पत्रकारांना सांगितले याबाबत अधिक तपास सुरू असून अद्याप कोणावरही गुन्हा नोंदवण्यात आलेला नसल्याचे पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
लवकरच याबाबत दोषींवर व घरगुती वापरायचे गॅस सिलिंडर व्यावसायिक कामाकरिता पुरवणाऱ्या गॅस एजन्सीवर कडक कारवाई करण्याचे संकेत पुरवठा विभागाने दिले आहेत. यामुळे पैसे वाचवण्याकरिता घरगुती सिलिंडर व्यावसायिक कामाकरिता वापरणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले आहे.








