ऋतुराज क्षीरसागर यांची माहिती : जयप्रभा स्टुडिओच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी/कोल्हापूर
जयप्रभा स्टुडिओच्या माध्यमातून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर टिका करुन रविकिरण इंगवले राजकीय पोळी भाजत आहेत. मात्र शासनस्तरावर जयप्रभा स्टुडिओ संदर्भात सकारात्मक प्रयत्न सुरु असुन राजेश क्षीरसागर लवकरच हा प्रश्न मार्गी लावतील. कलाकार, कोल्हापुरवासियांच्या भावनांचा आदर करत हि जागा कायदेशीररित्या शासनाकडे हस्तांतरित करण्यास महालक्ष्मी स्टुडीओच्या संचालकांनी यापुर्वीच संमती दिली आहे. त्यामुळे वैयक्तिक स्वार्थापोटी केलेल्या बदनामीकारक आंदोलनाबाबत इंगवले यांच्यावर 5 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती ऋतुराज क्षीरसागर यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयप्रभा स्टुडिओच्या प्रश्नी रविकिरण इंगवले यांनी गुरुवारी आंदोलन करत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यवर टिका केली. टिकेला क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले.
हे ही वाचा : मराठा आरक्षणासह इतर प्रश्न मार्गी लावा
ऋतुराज क्षीरसागर म्हणाले, इंगवले खंडणीची अपेक्षा ठेवून हे आंदोलन करत आहेत. मात्र आमचे संचालक मंडळ सक्षम असून त्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. आंदोलन करण्यापुर्वी इंगवले यांनी कंपनी कायदा जाणून घेणे आवश्यक होते. मात्र त्यांचा इतका आवाका नाही. तसेच इंगवले यांनी त्यांच्या स्थानिक निवडणुकीतील वाद मिटविण्यासाठी क्षीरसागर यांच्या घराच्या पायऱया झिजवल्या. त्यांच्या संपलेले राजकीय करिअर क्षीरसागर यांनी शहरप्रमुख पद देवून पुन्हा उर्जितावस्थेत आणले, हे इंगवले यांनी लक्षात ठेवावे. तसेच जयप्रभा स्टुडिओ प्रश्नी कलाकर, नागरिकांची दिशाभुल करणे थांबवावे. आमच्या दारात येवून बसणार असाल तर तुमच्या बैठकीची योग्य ती व्यवस्था करु असा टोला क्षीरसागर यांनी इंगवले यांना लगावला आहे.









