जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची माहिती : कुस्ती, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
बेळगाव : कित्तूर उत्सव हा राज्यस्तरीय उत्सव असल्याची घोषणा करून राज्य सरकारने गेल्या वर्षी 2 कोटी रुपये अनुदान दिले होते. यंदा या उत्सवासाठी 5 कोटी अनुदान मिळावे यासाठी सरकारकडे प्रस्ताव देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पूर्वतयारी बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ते म्हणाले, कित्तूर उत्सवासाठी कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्याकडून राज्य सरकारला 5 कोटी अनुदान द्यावे यासाठी निवेदन दिले आहे. यावेळी उत्सवामध्ये एकपेक्षा अधिक व्यासपीठ तयार करण्यात येणार आहेत. याबरोबरच काकती गावामध्येही व्यासपीठ निर्माण करण्यासाठी चर्चा करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्सव थाटामाटात करणार
वीरज्योती यात्रा राज्यभर काढली जाणार आहे. तसेच प्रवासी ठिकाणांवर ज्योत मिरवणूक काढून उत्सवाची जागृती करण्यात येणार आहे. याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. उत्सव अधिक थाटामाटात साजरा करण्यासाठी आवश्यक ती तयारी केली जाणार आहे. मिरवणूक, जेवण, वस्तू प्रदर्शन अशा विविध उपक्रमांसाठी समितींची रचना करण्यात येणार आहे. या समितीच्या सदस्यांना लवकरच कार्यतत्पर होण्यासाठी सूचना करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कुस्ती, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हा उत्सव अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी दि. 3 रोजी दुपारी 4 वाजता वीरभद्रेश्वर कल्याण मंडप येथे सभा घेतली जाणार आहेत. यामध्ये नागरिकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी पाच कोटी रुपयांचे अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात असून लवकरच निधी मंजूर झाल्यास कार्यक्रमाच्या तयारीला लागणार असल्याचे सांगितले. यावेळी कन्नड आणि सांस्कृतिक खात्याच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री, बैलहोंगल प्रांताधिकारी अधिकारी प्रभावती फकिरपूर, बेळगाव प्रांताधिकारी श्रवण नायक, नगरविकास खात्याचे योजनाधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.









