ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या मतदारसंघात रविवारी 13 ठिकाणी आखाड पाटर्य़ांचे आयोजन केले होते. तब्बल 1 लाख 37 हजार जणांनी या पार्टीत सहभाग नोंदवत 8 हजार किलो मटण, 8 हजार किलो चिकन फस्त केले. आतापर्यंतची ही रेकॉर्डब्रेक पार्टी असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येते.
मतदारसंघातील गोरगरीब, कष्टकरी, चाकरमानी यांच्यासोबत एकत्रितपणे आखाड पार्टी करण्यासाठी आम्ही 15 वर्षांपासून सुरुवात केली. त्याला आता भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. आपुलकीने नागरिक या स्नेहभोजनासाठी सहभागी होतात, याचे समाधान वाटते, असे आयोजक लांडगे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आखाड पार्टीत जेवलेल्या लोकांची एक प्लेट 350 रुपयांना पकडली तरी नुसत्या सामिष जेवणाचेच 4 कोटी 79 लाख 50 हजार रुपये होतात. शाकाहारी व्यक्तींसाठी वेगळी सोय होती. एकूण सगळा थाट पाहता जवळपास 5 कोटी रुपये एका दिवसात खर्च झाले असावेत. ही आखाड पार्टी साजरी करुन भाजप आमदाराने नव्या संस्कृतीचा पायंडा पाडला आहे. पाटर्य़ांसाठी एवढा पैसा येतो कुठून? साध्या-साध्या व्यवहारांची चौकशी करणारी ईडी एवढय़ा मोठय़ा जेवणावळीची चौकशी करणार आहे का? की भाजपच्या लोकांना हे सर्व माफ असते, असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित होत आहे.








