हावेरी पोलिसांकडून पाच जणांना अटक : 2 कोटीहून अधिक किमतीचा ऐवज जप्त
बेळगाव : कुपवाड, जि. सांगलीहून ट्रकमधून रॉ कास्टिंग घेऊन चेन्नईकडे निघालेल्या एका ट्रकचालकाचा खून करून सुमारे सव्वा कोटीचे साहित्य पळविणाऱ्या टोळीतील पाच जणांना हावेरी शहर पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी ही कारवाई करण्यात आली आहे. हावेरीचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. शिवकुमार गुणारी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली आहे. गुरुवार दि. 15 जून रोजी दरोड्याचा हा प्रकार उघडकीस आला होता. गोविंद नारायण खांडेकर (वय 40) मूळचा रा. हणमंतगाव, जि. सोलापूर, सध्या रा. कुंभारवाडा, ता. पलूस, जि. सांगली या ट्रकचालकाचा खून करून सुमारे 1 कोटी 33 लाख रुपयांहून अधिक किमतीचे रॉ कास्टिंग पळविण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी गेल्या शुक्रवार दि. 16 जून रोजी पंढरपूर रोड मिरज येथील महेश व्यंकटराव भोसले यांनी हावेरी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. हावेरीचे पोलीस उपअधीक्षक शिवानंद चलवादी यांच्या नेतृत्वाखाली हावेरी शहरचे पोलीस निरीक्षक सुरेश सगरी, ब्याडगीचे पोलीस निरीक्षक बसवराजू पी. एस., हिरेकेरुरचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील, हानगलचे एस. आर. श्रीधर यांच्यासह हावेरी जिल्ह्यातील अनेक अधिकाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला आहे. या घटनेनंतर पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.
हणमंत ऊर्फ बसवराजू ऊर्फ नजीर सिद्दाप्पा काळगी ऊर्फ व•र, रा. कुडलगी, ता. गदग, शिवराजू विजय सातेनहळ्ळी, रा. मडलूर, ता. हिरेकेरुर, शिवकुमार गणेशाप्पा दो•गौडर, रा. बसरीहळ्ळी, ता. हिरेकेरुर, संजीव शण्मुखप्पा बणकार, रा. लिंगदेवरकोप्प, ता. रट्टीहळ्ळी, चंद्रू शंकराप्पा हुडेद, रा. व्हलबीकोंडू, ता. हिरेकेरुर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या टोळीतील पवन नामक आणखी एक संशयित अद्याप फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एमएच 43, बीजी 2617 क्रमांकाच्या ट्रकमधून पाणी, गॅस, पेट्रोल, डिझेल पाईपलाईनसाठी वापरण्यात येणारे प्रेशर व्हॉल्व (रॉ कास्टिग) भरून 13 जून रोजी दुपारी 3 वा. ही ट्रक कुपवाडहून चेन्नईला निघाली होती. 15 जून रोजी सकाळी हावेरी बायपासजवळ महामार्गाशेजारी ट्रकचालक गोविंद खांडेकर जखमी अवस्थेत आढळला आला होता. जीवघेण्या हल्ल्यात तो जखमी झाला होता. त्याला हुबळी येथील किम्समध्ये दाखल केले होते. त्याच दिवशी रात्री त्याचा मृत्यू झाला. अटक करण्यात आलेल्या पाच जणांच्या टोळीकडून 120 प्रेशर व्हॉल्व (1 कोटी 33 लाख 4300 रुपये), चालकाचा खून करून रॉ कास्टिंग पळविण्यासाठी वापरण्यात आलेली केए 68, एन 3079 क्रमांकाचा एक ट्रक (किंमत 34 लाख रुपये), सुमारे 36 लाख रुपये किमतीचा एक टिप्पर, एक मोटारसायकल व कुपवाडहून चेन्नईला निघालेला एमएच 43, बीजी 2617 क्रमांकाचा ट्रक, चार मोबाईल असा एकूण 2 कोटी 8 लाख 4300 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.









