वृत्तसंस्था/ शिंग्टन
प्रशिक्षणादरम्यान सैन्याचे हेलिकॉप्टर भूमध्य समुद्रात कोसळून रविवारी मोठी दुर्घटना घडली. या अपघातात 5 अमेरिकन सैनिकांना हौतात्म्य आल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. मात्र, हा अपघात कुठे झाला याची नेमकी माहिती अधिकाऱ्यांनी दिली नाही. इस्रायल-हमास युद्धाचे प्रादेशिक संघर्षात रूपांतर होऊ नये यासाठी अमेरिकेने भूमध्य समुद्रात लढाऊ युद्धनौका तैनात केली आहे. याचदरम्यान सरावावेळी दुर्घटना घडल्याचा दावा केला जात आहे. हुतात्मा झालेले सैनिक एमएच-60 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरचे क्रू सदस्य होत. इंधन भरण्याची प्रशिक्षण मोहीम सुरू असताना हेलिकॉप्टर सायप्रसच्या किनाऱ्यावर कोसळल्याचे तीन अमेरिकन अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सैनिकांप्रति राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी श्र्रद्धाजली वाहिली आहे. आमचे सैनिक दररोज देशासाठी आपला जीव धोक्मयात घालतात. अमेरिकन लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी ते स्वेच्छेने धोका पत्करतात, असेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनीही एका निवेदनात शोक व्यक्त केला.









