पाण्याचा जपून वापर करा : पावसाळी हंगामापर्यंत पाणीसाठा टिकविण्याचे आव्हान
संकेश्वर : हिडकल येथील राजालखमगौडा जलाशयात बुधवार दि. 17 मे अखेर 5.88 टीएमसी पाणीसाठा आहे. यापैकी दोन टीएमसी पाणीसाठा वगळता वापरात येणारा केवळ 3 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या शेतीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून बेळगाव, हुक्केरी व संकेश्वर या शहरांना पिण्यासाठी 60 क्युसेक पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. य् ांदा जलाशयातील पाणी साठ्यातून विजापूर, बागलकोट, चिकोडी इत्यादी लाभार्थी भागात मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे जलाशयातील पाणीसाठा घटला आहे. सध्या उपलब्ध असणारा 3 टीएमसी पाणीसाठा पावसाळी हंगामापर्यंत बेळगाव, हुक्केरी व संकेश्वर या लाभार्थी भागात नियमितपणे पुरवठा करावा लागणार आहे. यासाठी पाण्याची नासाडी रोखण्याबरोबरच पाण्याची बचत करावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. य् ांदा मान्सूनचे 14 जूनपासून सर्वत्र आगमन होणार आहे. पण जून महिन्यात पावसाचे प्रमाण अल्प असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे लांबणीवर पडणाऱ्या पावसाने पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय पिण्यासाठी पर्यायी पाणीपुरवठा योजना तालुक्यात नसल्यामुळे पाण्याविना जनतेचे हाल होण्याची चिन्हे आहेत.
शेतकरी वळिवाच्या प्रतीक्षेत
सध्या कडक उन्हाचे दिवस असल्यामुळे तापमानाचा पारा 39 ते 40 अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. गत आठवड्यात वळीव पावसाने हजेरी लावल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. पण सध्या वळिवाची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी हतबल होताना वळिवाच्या प्रतीक्षेत आहे. वळिवाने हजेरी लावल्यास शेती पिकांना फायदेशीर ठरणार आहे.









