बिहारमध्ये कार्यकारी अभियंत्याच्या निवासांवर धाड, दागिन्यांसह मौल्यवान वस्तूही जप्त किशनगंज
पाटणा / वृत्तसंस्था
बिहारमध्ये ग्रामविकास विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या निवासांवर शनिवारी दक्षता विभागाने छापे टाकले. या कारवाईमध्ये 5 कोटींहून अधिक रोकड जप्त केली आहे. अभियंता संजय कुमार राय यांच्या पाटण्यातील दोन आणि किशनगंजमधील तीन ठिकाणी मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत. पाटणा येथे 1.25 कोटी आणि किशनगंजमधून 4 कोटी रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी सापडलेली सव्वापाच कोटी रुपये इतकी रोख रक्कम मोजणीसाठी मशीन्स मागवण्यात आल्या होत्या. तसेच लाखो रुपयांचे दागिने, मौल्यवान वस्तू, जमीन आणि आर्थिक गुंतवणुकीची कागदपत्रे सापडली आहेत.
अभियंता संजय कुमार राय यांचे घर पाटणा येथील वसंत बिहार कॉलनीत आहे, तर पोस्टिंग किशनगंज जिह्यात आहे. शनिवारी सकाळी 7 वाजता पाटणा आणि किशनगंजमध्ये दक्षता विभागाच्या दोन पथकांनी एकाचवेळी छापे टाकले. किशनगंजमध्ये 13 सदस्यांच्या पथकाने संजय कुमार राय यांच्या निवासासह त्यांचे स्वीय सहाय्यक ओमप्रकाश यादव यांच्या लाईनपारा आणि कार्यालयातील कॅशियर खुर्रम सुलतान यांच्या घरावर छापा टाकला.
पाटणा येथे छापा टाकणारे डीएसपी सुजित कुमार सागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियंत्याकडून अवैध कमाईची तक्रार आल्यानंतर तपास करण्यात आला. त्यात भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे होते. दक्षता पथकातील अधिकाऱयांनी अभियंता संजय कुमार यांच्या बँक खात्यांची तपासणीही केली. यामध्ये अनेक संशयास्पद व्यवहार झाल्याचे आढळून आल्यानंतर पाटणा येथील पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला.









