विजय सरदेसाई यांचा आयपीबीवर आरोप, : कृषी जमिनीचाही समावेश; उद्योगमंत्री माविन गुदिन्होंनी आरोप फेटाळला
पणजी : गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (आयपीबी) गैरवापर करून सुमारे 5.24 लाख चौ. मी. जमीन रूपांतरीत केल्याचा ठपका आमदार विजय सरदेसाई यांनी ठेवला, हे सर्व बेकायदेशीर असल्याचा आरोप करून त्यांनी सरकारला धारेवर धरले. मंडळाने 80 प्रकल्पांना मान्यता दिली असली तरी प्रत्यक्षात 13 प्रकल्पच सुरू झाल्याचे निदर्शनास आणले. त्या रूपांतरीत जमिनीत नैसर्गिक वन-कृषी जमिनीचादेखील समावेश असल्याचा दावा सरदेसाई यांनी केला. कृषी जमिनीचे रूपांतर केल्याचा आरोप उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी फेटाळला. आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी केपेतील उद्योगांसाठी असलेल्या जमिनीचा प्रश्न उपस्थित होता. त्यावर देण्यात आलेल्या लेखी उत्तरातून सरदेसाई यांनी गुदिन्हो यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरूवात केली. मंडळातर्फे अनेक प्रकल्पांना मान्यता देण्यात येते. परंतु ते प्रत्यक्षात सुरूच होत नाहीत, असे त्यांनी निदर्शनास आणले.
259 प्रकल्पांना मान्यता, 54252 जणांना मिळणार नोकऱ्या!
यावर उत्तर देताना गुदिन्हो म्हणाले की, मंडळामार्फत 259 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून त्यातून रु. 19000 कोटीची गुंतवणूक होणार आहे. त्यातून 54252 जणांना नोकऱ्यांचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत गोमंतकीयांना 45 टक्के नोकऱ्या मिळाल्याचा दावा गुदिन्हो यांनी केला. त्यावेळी चर्चेत हस्तक्षेप करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंडळाने मान्यता दिलेल्या प्रकल्पातून 2899 नोकऱ्या देण्यात आल्या, अशी माहिती दिली तर गुदिन्हो यांनी 10832 जणांना नोकरीची संधी मिळाल्याचे सांगितले. दोघांच्या आकडेवारीत तफावत असल्याने सरदेसाई यांनी दोघांना धारेवर धरले तेव्हा मुख्यमंत्र्यांची माहिती एका वर्षांची असून गुदिन्होंची माहिती अनेक वर्षांची असल्याचा खुलासा करण्यात आला.
केपेत जमीन उपलब्ध, पण उद्योगच नाहीत : डिकॉस्ता
डिकॉस्ता यांनी त्यावेळी बोलताना सांगितले की, किटला-केपे येथे सुमारे 12 लाख चौ. मी. जमीन उद्योगांसाठी आहे परंतु तेथे उद्योगच येत नाहीत. हे मोठे दुखणे आहे. तेथे उद्योग आणावेत आणि केपेतील बेकारी काही प्रमाणात तरी दूर करावी, अशी मागणी डिकॉस्ता यांनी केली. त्यावर गुदिन्हो म्हणाले की, उद्योगांचा विकास करताना समतोलपणा बघावा लागतो. घाईने प्रकल्प आणले तर मग विरोध होतो म्हणून घाई नको, असे सांगून येथे चांगले प्रकल्प आणण्याचे आश्वासन दिले.
पेडणेतील मिनी इंडिया प्रकल्पात कॅसिनो आहे काय?
या चर्चेत डिकॉस्ता यांनी पेडण्यातील ‘मिनी इंडिया’ प्रकल्पाचा उल्लेख केला आणि त्यात कॅसिनो आहे काय? अशी विचारणा केली. त्यावर अधिक माहिती देताना गुदिन्हो यांनी त्यात कोणत्याही प्रकारच्या कॅसिनो नसल्याचा दावा केला. ‘मिनी इंडिया’शी कॅसिनोचा संबंध नाही. उगाच विनाकारण गैरसमज पसरवले जातात. त्या प्रकल्पात देशातील विविध राज्यातील प्रसिद्ध पर्यटन व इतर स्थळांच्या प्रतिकृती उभारण्यात येणार असून तेथे गेल्यावर त्या त्या राज्यात असल्याचा भास होणार आहे. हा एक वेगळाच प्रकल्प असून त्याची कॅसिनो म्हणून अफवा पसरवू नये, असे गुदिन्हो यांनी नमूद केले.









