जिंदाल स्टील अँड पॉवरचा सर्वाधिक परतावा
वृत्तसंस्था/ मुंबई
सेन्सेक्स व निफ्टी बाजारात धातू क्षेत्रातील समभागांनी गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. स्थानिक बाजारात पोलादाच्या वाढलेल्या किमती व कोळशावर कमी झालेला खर्च ही कारणे यासाठी सांगितली जात आहेत. पोलाद कंपन्यांना याचा लाभ झाला असल्याचे समजते. येणाऱया काळातही पोलाद कंपन्या चांगली कामगिरी करू शकणार असल्याचा अंदाज तज्ञांकडून वर्तवला जात आहे.
गेल्या 9 महिन्यात 6 कंपन्यांनी गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला असल्याचे दिसून आले आहे. पोलाद कंपन्यांचे बाजारातील समभागांचे मूल्य कमी आहे. मागणी व पुरवठा यात असणारा फरक हे यामागचे कारण सांगितले जाते. एप्रिलपासून ते आतापर्यंत बीएसई मेटल इंडेक्समध्ये (धातू निर्देशांक) 82 टक्के वाढ झाली आहे. जिंदाल स्टील अँड पॉवरच्या समभागांनी तब्बल 208 टक्के इतकी तेजी दर्शवली आहे. जेएसडब्ल्यू स्टीलच्या समभागात एप्रिल ते आत्तापर्यंत 144 टक्के तेजी दिसली आहे. हिंडाल्को 140 टक्क्मयांनी, टाटा स्टील आणि सेल यांनी 117 टक्क्मयांनी दरम्यानच्या काळात वाढ दर्शवली आहे. याखेरीज नाल्को, हिंदुस्तान झिंक व वेदांता यांच्या समभागात 1 एप्रिल ते 1 डिसेंबरच्या काळात 35 ते 90 टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत बीएसई निर्देशांकाने जवळपास 52 टक्के तेजी दर्शवली आहे.









