सर्वोच्च न्यायालयाच्या ऑक्सिजन पुरवठय़ाच्या आदेशावर गर्व – सरन्यायाधीशांकडून कौतुकास्पद प्रतिसाद
वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम
केरळमधील 5 वीत शिकणाऱया विद्यार्थिनीने कोरोनाकाळात सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्यात आलेल्या निर्णयांचे कौतुक केले आहे. या विद्यार्थिनीने सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांना पत्रही लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्सिजन पुरवठय़ासंबंधी निर्णय घेतल्याने अनेक जीव वाचू शकल्याचे तिने पत्रात म्हटले आहे. तर उत्तरादाखल सरन्यायाधीशांनी विद्यार्थिनीला तू जबाबदार आणि सजग नागरिक होणार असा विश्वास असल्याचे कळविले आहे.
मी लिडविना जोसेफ असून त्रिशूरच्या केंद्रीय विद्यालयात 5 वीत शिकते. मी वृत्तपत्रातील मुख्य वृत्त वाचले, दिल्ली आणि देशाच्या अन्य भागात कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंमुळे मी त्रस्त होते. कोरोनाकाळातील सर्वसामान्यांच्या अडचणी आणि मृत्यूंप्रकरणी तुमच्या न्यायालयाने प्रभावीपणे हस्तक्षेप केल्याचे मला वृत्तपत्रामुळे कळले. न्यायालयाने ऑक्सिजन पुरवठय़ासंबंधी निर्णय दिल्याने मी आनंदी आहे आणि याचा मला गर्वही वाटतो. तुमच्या न्यायालयाने कोरोनावर नियंत्रण आणि बळींचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक प्रभावी पावले उचलली. याकरता माननीय न्यायाधीश महोदय मी तुमचे आभार मानते असे तिने पत्रात नमूद केले आहे.
सरन्यायाधीशांकडून पत्राला उत्तर
सरन्यायाधीश रमणा यांनी उत्तरादाखल पत्र लिहिले आहे. ‘प्रिय लिडविना मुला तुझे सुंदर पत्र आणि न्यायाधीशांचे चित्र मिळाले. तू ज्याप्रकारे देशाच्या घटनांवर नजर ठेवते आणि महामारीदरम्यान लोकांच्या भल्यावरून तू जी चिंता व्यक्त केली आहे, ते पाहता मी अत्यंत प्रभावित आहे. तू एक सजग, जबाबदार आणि माहिती ठेवणारी अशी नागरिक होशील जी राष्ट्रउभारणीत मोठे योगदान करेल असा मला पूर्ण विश्वास आहे. तुझ्या यशासाठी शुभेच्छा देतो असे सरन्यायाधीशांनी पत्राद्वारे तिला सांगितले आहे. या पत्रासोबत सरन्यायाधीशांनी घटनेची एक प्रतही लिडविनाला पाठविली असून त्यावर त्यांची स्वाक्षरी आहे.









