वृत्तसंस्था / शिलाँग
मेघालयातील काँग्रेसच्या सर्व 5 आमदारांनी मंगळवारी मेघालय डेमोक्रेटिक अलायन्समध्ये (एमडीए) सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. मेघालयात विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला 2023 च्या महत्त्वपूर्ण विधानसभा निवडणुकीपूर्वी हा मोठा झटका असल्याचे मानले जातेय. राज्यात एमडीएचे सरकार आहे.
एमडीएमध्ये आलेल्या काँग्रेसच्या 5 आमदारांमध्ये सीएलपी नेते अंपारीन लिंगडोह, मायरलबोर्न सिएम, मोहेंड्रो रापसंगा, किम्फा मारबानियांग आणि पीटी सॉकमी सामील आहेत. मंगळवारी पाचही आमदारांनी बैठक घेत मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांना पत्र सोपविले.
पुढीलवर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससाठी हा मोठा झटका आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 19 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. परंतु त्याला सरकार स्थापन करता आले नव्हते. भाजपच्या नेतृत्वाखाली नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्सचा सहकारी पक्ष एनपीपीने एमडीएची स्थापना करत काँग्रेसकडून सत्ता काढून घेतली होती.
मेघालय हे राज्य एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होते. परंतु तृणमूल काँग्रेस आता 60 सदस्यीय मेघालय विधानसभेत मुख्य विरोधी पक्ष आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये माजी मुख्यमंत्री डॉ. मुकुल संगमा यांच्याबरोबरच 11 अन्य काँग्रेस आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. संगमा यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसकडे केवळ 5 आमदार राहिले होते. पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला दोन जागा गमवाव्या लागल्या होत्या.









