भूसुरुंग पेरत सोडले शहर ः युक्रेनचे आता राजधानीवर पूर्ण नियंत्रण
युक्रेनची राजधानी कीव्हनजीकच्या भागावर शनिवारी संध्याकाळी युक्रेनचे नियंत्रण प्रस्थापित झाले आहे. सुमारे 5 आठवडय़ांनी रशियाचे सैन्य येथून हटले आहे. यामुळे कीव्ह आणि परिसरातील लोकांना हल्ल्यापासून बचावासाठी वाजत राहणारे सायरन आणि गोळीबार-बॉम्बवर्षावाच्या स्फोटांपासून दिलासा मिळाला आहे. यापूर्वी कीव्हला वेढा घालत रशियाच्या सैन्याने राजधानीवर अनेक आठवडय़ांपर्यंत हल्ले केले, परंतु युक्रेनच्या एका सैनिकाने स्फोटकांद्वारे एक पूल नष्ट केल्याने रशियाच्या सैन्याला कीव्हमध्ये प्रवेश करणे अशक्य झाले. कीव्हच्या पश्चिम भागात असलेल्या दिमित्रिव्का येथे एक रशियन चिलखती वाहन जळताना दिसून आले असून तेथेच रशियाच्या 8 सैनिकांचे मृतदेह पडलेले होते.

युक्रेनकडून निकराचा प्रतिकार
मागे हटणारे रशियन सैनिक भूसुरुंग पेरत असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी म्हटले आहे. यामुळे अनेक ठिकाणी भूसुरुंग स्फोटाच्या तावडीत सापडून अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. राजधानी कीव्हनजीकचा परिसर 24 फेब्रुवारीनंतर काही दिवसातच रशियाच्या ताब्यात आला होता. परंतु युक्रेन सैन्याकडून निकराचा प्रतिकार झाल्याने रशियाच्या सैन्याला कीव्हमध्ये प्रवेश करता आला नव्हता.
पोलटावा, क्रेमेनचुकमध्ये हवाई हल्ले
तुर्कस्तानात युक्रेन आणि रशियाच्या शिष्टमंडळादरम्यान झालेल्या चर्चेत रशियाने कीव्ह आणि चर्निहाइव्हवरील हल्ले थांबविण्याची आणि तेथून सैन्य हटविण्याची घोषणा केली होती. तर रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या अन्य भागांमधील हल्ले सुरूच ठेवले आहेत. मागील 24 तासांमध्ये मध्य युक्रेनच्या पोलटावा आणि क्रेमेनचुकमध्ये रशियाने हवाई हल्ले केले आहेत. तर डिनिप्रोच्या क्रिव्ही शहरात पेट्रोल स्टेशनवर गोळीबार झाला आहे. ओडेसा या बंदर असलेल्या शहरात रशियाने क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. रशियाचे सैन्य आता पूर्व युक्रेनवर कब्जा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. लुहांस्कच्या मोठय़ा भागावर रशियाच्या सैन्याने कब्जा केला आहे.
बेलगोरोद हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार
रशियाचे सीमावर्ती शहर बेलगोरोदमध्ये शुक्रवारी झालेल्या हवाई हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास युक्रेनने नकार दिला आहे. काही कारणांमुळे बेलगोरोद येथे तेलडेपोला लागलेल्या आगीसाठी रशिया युक्रेनला जबाबदार ठरवू पाहत आहे. परंतु युक्रेनने रशियाच्या सीमेत अशाप्रकारचा कुठलाच हल्ला केलेला नसल्याचे युक्रेनच्या सुरक्षा परिषदेचे सचिव ओलेक्सी दानिलोव्ह यांनी म्हटले आहे.









