निवडक देशांमधील 5 जी सेवेचा प्रवास समाधानकारक, डाऊनलोड वेग अधिक असल्याने लोकप्रियता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जगभरातील विविध देशांमध्ये 5 जी नेटवर्कची सुविधा सुरु करण्यात आली आहे. यामध्ये काही देशांत प्रायोगिक पातळीवर या सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. सदर कालावधीत इंटरनेट वेगाची चाचणी करणारी कंपनी ओपनसिग्नल यांच्याकडून 5 जी सेवेशी संबंधीत एक अहवाल सादर करण्यात आला आहे.
जगामध्ये सर्वाधिक डाऊनलोडिंग सौदी अरेबिया येथे झाले आहे, तर दुसऱया स्थानी दक्षिण कोरिया असल्याची माहिती ओपनसिग्नलने दिली आहे.
सौदी अरेबियात मध्ये 5 जी नेटवर्कवर डाऊनलोडचा वेग हा सरासरी 377.2 एमबीपीएस राहिला आहे. दुसऱया बाजूला दक्षिण कोरियामधील 5 जी नेटवर्कच्या आधारे डाऊनलोड वेग हा 336.1 एमबीपीएस इतका राहिल्याची नोंद ओपनसिग्नलच्या माहितीत आहे. 15 देशांची 5 जी वेगाशी संबंधीत असणारी माहिती 1 जुलै ते 28 सप्टेंबरपर्यंतच्या काळात नोंदविण्यात आली.
सौदी अरबमधील 5जीचा एमबीपीएस वेग लक्षात घेतल्यास जवळपास 1 सेकंदामध्ये 377.2 एमबीपीएस इतका डाटा डाऊनलोडचा वेग आहे. म्हणजे 1 जीबी क्षमतेचा कोणताही चित्रपट डाऊनलोडसाठी फक्त 3 सेकंदाचा वेळ लागत असल्याची माहिती आहे. या वेगाची तुलना भारताच्या 4 जी स्पीड सोबत केल्यास ट्रायच्या माहितीनुसार रिलायन्स जिओची 4 जी डाऊनलोड स्पीड क्षमता ही 33.3 एमबीपीएस इतकी आहे. भारतात अद्य़ाप 5 जी सेवेचा प्रारंभ करण्यात आलेला नाही. मात्र तो लवकरच होण्याची शक्यता आहे.









