वृत्तसंस्था / वाराणसी
ज्ञानवापी परिसरातील व्यासजी तळघराच्या सर्वेक्षणासंबंधी न्यायालय 4 ऑक्टोबरला निर्णय देणार आहे. या प्रकरणी शनिवारी सुनावणी पूर्ण करण्यात आली असून हिंदू पक्षकारांनी या स्थळाच्या सर्वेक्षणाशिवाय सत्य उलगडणार नाही, असा युक्तीवाद केला आहे. मुस्लीम पक्षाचा सर्वेक्षणाला विरोध आहे.
या तळघराला दरवाजे नाहीत. त्यामुळे कोणीही आत जाऊन पुरावे नष्ट करु शकतो. त्यामुळे ज्ञानवापीचे सत्य उलगडणे अशक्य होणार आहे. त्यामुळे न्यायालयाने या तळघराच्या त्वरित सर्वेक्षणाला अनुमती द्यावी, असे हिंदू पक्षकार शैलेंद्र व्यास यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले. मात्र, मुस्लीम पक्षकारांनीं याचा प्रतिवाद केला. या तळघराचे दरवाजे बंद होते. आमच्याकडे त्याच्या चाव्या होत्या. सर्वेक्षणाचा आदेश दिल्यानंतर आम्ही दरवाजे उघडले, असे त्यांचे म्हणणे होते.
1993 पूर्वी हिंदूंच्या आधीन
हे व्यासजी तळघर 1993 पूर्वी वादी शैलेंद्र व्यास यांच्या आधीन होते. येथे नित्य पूजापाठ आणि अनुष्ठाने चालत होती. 1993 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने हे तळघर मुस्लीमांच्या ताब्यात दिल्याने येथे पूजापाठ बंद पडले आहेत. येथे पूजापाठ करण्याचा वादींना आणि हिंदूंना पूर्ण आणि परंपरागत अधिकार आहे. 1993 पासून त्यांना या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या तळघरात आता वादी आणि त्यांच्या कुटुंबियांना येऊ दिले जात नाही. त्यामुळे न्यायालयाने ही अनुमती द्यावी, अशी मागणी हिंदू पक्षकारांनी न्यायालयाकडे केली आहे.









