कोल्हापूर :
कोल्हापूर जिह्यात महावितरणकडून वीज ग्राहकांच्या विविध तक्रारी सोडविण्यासाठी सहा विभाग व 30 उपविभाग अंतर्गत 14 जुलै रोजी एकाच दिवशी 30 ठिकाणी ग्राहक मेळावे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यात जिह्यातील 612 ग्राहकांनी सहभाग घेतला. यापैकी 517 ग्राहकांच्या तक्रारी जागेवर सोडवण्यात आल्या. तर प्रलंबित 95 तक्रारीं विहित वेळेत निकाली काढण्याचे आदेश कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी दिले.
महावितरणतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध सेवा व सुविधांच्या अनुषंगाने ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्या तक्रारींचे निरसन वेळेत होण्याच्या दृष्टीने महावितरण महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या सोमवारी विभागीय तसेच उपविभागीय स्तरावर ग्राहक मेळावे घेते. जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या या मेळाव्यांत ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तक्रारींची सोडवणुक करण्यात आली. यावेळी कोल्हापूर शहर विभाग 96 पैकी 81 तक्रारी, कोल्हापूर ग्रामीण 1 विभागातील 102 पैकी 100 तक्रारी, कोल्हापूर ग्रामीण 2 विभागातील 134 पैकी 98 तक्रारी, गडहिंग्लज विभागातील 69 पैकी 69 तक्रारी, इचलकरंजी विभागातील 134 पैकी 102 तक्रारी, जयसिंगपूर विभागातील 77 पैकी 67 तक्रारी जागेवर सोडवण्यात आल्या.
ग्राहकाने दाखल तक्रारींत प्रामुख्याने नवीन वीज जोडणी, वाढीव वीज बिले, सौर कृषी पंप, कृषिपंप ग्राहकांचा वीज भार कमी करणे, स्मार्ट टीओडी मीटरच्या तक्रारी व विविध शंका यांचा प्रामुख्याने समावेश होता. या मेळाव्यात स्मार्ट टीओडी मीटरच्या संबधीत सर्वच तक्रारींचे प्रात्यक्षिकांसह निरसन करण्यात आले. यावेळी ग्राहकांना पीएम सुर्य घर योजना, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देणेकरीता कुसुम बी व मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी योजनांची माहिती देण्यात आली.
- ग्राहक मेळाव्यांची व्याप्ती वाढवणार
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आदेशानुसार ग्राहक मेळाव्यांची सुरुवात करण्यात आली आहे. मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या मार्गदर्शनात भविष्यात या मेळाव्यांची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. त्यानुसार दर पंधरवड्यात ग्राहक मेळावे घेण्याचा आमचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच लवकरच ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडविण्यावर भर राहील असे कोल्हापूर मंडल कार्यालायचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी यावेळी सांगितले.








