30 वर्षे 8 महिने 27 दिवसांनी पुन्हा शिलान्यास : लाखो कारसेवकांचे योगदान फलदायी : लढय़ात अनेकांचे बलिदान
492 वर्षांनी अयोध्येत पुन्हा भव्य राम मंदिराची उभारणी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन करत मंदिर उभारणीच्या कार्यास प्रारंभ केला आहे. तर 30 वर्षे 8 महिने 27 दिवसांनी राम मंदिरासाठी दुसऱयांदा शिलान्यास झाला आहे.
या 492 वर्षांमध्ये रामनगरी अयोध्येने अनेक घडामोडी अनुभवल्या आहेत. भगवान श्रीरामाचे मंदिर पाडून तेथे परकीय आक्रमकांकडून मशिद उभारण्यात आली, कालौघात रामजन्मभूमीवरील मशिद पडल्यावर ती पुन्हा बांधण्यात आली. 167 वर्षांपूर्वी मंदिराच्या मुद्दय़ावरून अयोध्येत पहिल्यांदा हिंसाचार झाला, तर 162 वर्षांपूर्वी या वादात पहिला एफआयआर नोंदविला गेला होता. 135 वर्षांपूर्वी संबंधित जागेचा वाद न्यायालयात पोहोचला होता. तर 8 महिने 27 दिवसांपूर्वी म्हणजेच मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अयोध्येतील संबंधित जागेवर रामलल्ला पुन्हा विराजमान होण्यासंबंधीचा सर्वोच्च निर्णय देण्यात आला.
एक दीर्घ कायदेशीर लढय़ाची कथा, सर्वात मोठय़ा वादाची सर्वात मोठी कथा, श्रद्धा आणि ऐतिहासिक विश्वासाची कथा, संघर्षाची गाथा, योगायोगांची कथा आणि न्यायाच्या विजयाची कथा असं बरंच काही या शतकांमध्ये अयोध्यानगरीने अनुभवले आहे.
1526 मध्ये बाबर इब्राहिम लोदी या परकीय शासकाने भारतावर आक्रमण केले होते. 2 वर्षांनी 1528 मध्ये बाबरचा सुभेदार मीरबाकीने अयोध्येत मंदिर पाडून त्यास्थानी मशिदीची बांधणी केली. या मशिदीला बाबरचे नाव देण्यात आले. 330 वर्षांनी 1858 मध्ये रामाची जन्मभूमी पुन्हा मिळविण्याचा लढा सुरू झाला होता. तत्कालीन वादग्रस्त परिसरात रामभक्तांनी होम, पूजन केल्याप्रकरणी एक एफआयआर दाखल झाला होता.
‘अयोध्या रिविजेटेड’ पुस्तकानुसार 1 डिसेंबर 1858 रोजी अवध पोलीस स्थानक प्रमुख शीतल दुबे यांनी स्वतःच्या अहवालात परिसरात चबूतरा असल्याचे नमूद केले होते. परिसरात रामजन्मभूमी असल्याचे पुरावे दर्शविणारा हा पहिला कायदेशीर दस्तऐवज ठरला होता.
या घटनेच्या 27 वर्षांनी प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. महंत रघुवर दास यांनी फैजाबाद जिल्हा न्यायालयात राम जन्मभूमीवर मंदिर उभारणीसाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यांची याचिका रद्द केली होती. 1886 मध्ये या निर्णयाच्या विरोधात दाद मागण्यात आली, परंतु तेथेही अपयश पत्करावे लागले होते.
22-23 डिसेंबर 1949 रोजी तत्कालीन वादग्रस्तस्थळी मध्यवर्ती डोमच्या खाली रामलल्लाची मूर्ती स्थापित करण्यात आल्यानंतर या लढय़ाला खऱया अर्थाने वेग मिळाल्याचे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. 23 डिसेंबर रोजी या प्रकरणी एफआयआर नोंदविला गेला होता. परिसरातील प्रवेशद्वार बंद करण्यात आले. नगराध्यक्षाला वादग्रस्त क्षेत्राचा ताबेदार घोषित करण्यात आले. 5 जानेवारी रोजी नगराध्यक्ष प्रियदत्त राम याचे ताबेदार झाले. 1950 मध्ये याप्रकरणी पुन्हा याचिका दाखल करण्यात आली आणि 2019 पर्यंत ही कायदेशीर लढाई सुरू झाली. अखेर सत्य आणि इतिहासाचा विजय होत राममंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
अध्यात्म, संस्कृती, आधुनिकतेचा अद्भूत संगम
भविष्यातील अयोध्यानगरी अध्यात्म, संस्कृती आणि आधुनिकतेचा अद्भूत संगम असणारी असेल आणि धार्मिक पर्यटनाचे जगातील सर्वात मोठे केंद म्हणून याची ओळख निर्माण होणार आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपात स्थानिकांसह राज्य-देशातील आर्थिक प्रगतीत याची हिस्सेदारी वाढणार आहे. नव्या अयोध्येत पोहोचणे सुलभ राहणार असून श्रीराम विमानतळ निर्माण करण्याची तयारी आहे. रेल्वेस्थानक आणि बसस्थानकाचे आधुनिकीकरण केले जातेय. राम मंदिर उभारणीसह या दिशेनेही कार्य सुरू करण्यात आले आहे. 251 मीटरचा भगवान श्रीरामाचा पुतळा आणि नवी अयोध्या या नगरीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
दिव्य-भव्य, अनुपम-अलौकिक
राम मंदिर 360 फूट लांब आणि 235 फूट रुंदीचे असणार आहे. तर त्याची उंची 161 फूट तर क्षेत्रफळ 84,600 चौरस फूट असेल. गर्भगृह आणि रंगमंडपादरम्यान गूड मंडप असणार आहे. तर डाव्या-उजव्या बाजूला कीर्तन आणि प्रार्थना मंडप असेल. 950 किलो चांदीने निर्मित सिंहासनावर रामलल्ला विराजमान होणार आहेत.
नवी अयोध्या
400 हेक्टरमध्ये वसविली जाणारी ही नगरी अयोध्येचा आधुनिक चेहरा असेल आणि विदेशी पर्यटकांना केंद्रस्थानी ठेवून तिची उभारणी केली जाणार आहे. अयोध्येपासून 10 किलोमीटर अंतरावर शाहनेवाजपूर गावानजीक ही नगरी वसविण्यात येणार आहे. नवी अयोध्या 500 एकरमधील अत्याधुनिक वसाहत ठरणार असून यात पंचतारांकित हॉटेल्स, रिव्हरसाइड रिजॉर्ट, बहुमजली इमारती, व्यावसायिक भूखंड, उत्तम रस्ते, सांडपाणी वाहून नेण्याची भूमिगत व्यवस्था आणि भूमिगत वीजपुरवठा यंत्रणा असेल. शरयू तीरावर स्टुडिओ अपार्टमेंट निर्माण केले जाणार आहेत. तसेच नदीत क्रूजसेवाही चालविली जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे 1,200 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. राम वन गमन मार्गाशी जोडले जाणे अयोध्येत येणाऱया भाविकांचे अतिरिक्त आकर्षण असेल.
तिन्ही मजल्यांवर गर्भगृह
प्रस्तावित मंदिराच्या प्रथम मजल्याच्या गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापित केली जाईल. तर दुसऱया मजल्याच्य गर्भगृहात रामदरबारची स्थापना होणार आहे. एका मजल्यावर भगवान श्रीरामांशी संबंधित मार्मिक प्रसंग दर्शविण्यात येणार आहेत.
स्थापत्यशैली
राम मंदिर नागर शैलीत उभारले जाणार आहे. याच शैलीत देशातील अन्य मोठी मंदिरे निर्माण करण्यात आली आहेत. खजुराहो, सोमनाथ मंदिर, लिंगराज मंदिर, दिलवाडा जैन मंदिर इत्यादी नागर शैलीत उभारली गेली आहेत. या शैलीत कळसाची निर्मिती वैशिष्टय़पूर्ण असते.
कळस
मंदिरात एकूण 6 कळस असतील. यातील एक मुख्य कळस असणार आहे. 3 मजली मंदिराच्या प्रत्येक मजल्यावर 8 फूट व्यासाचे 106 स्तंभ असणार आहेत. पहिल्या मजल्यावरील स्तंभाची उंची 15.5 फूट असेल. दुसऱया मजल्याची उंची 14.5 फूट असेल आणि तेथे 318 स्तंभ असणार आहेत. हे स्तंभ 14 ते 16 फूट उंचीचे आणि 8 फूट व्यासाचे असतील. प्रत्येक स्तंभ यक्ष-यक्षिणींच्या 16 मूर्तींनी सजलेला असणार आहे.
पराशरन यांनी टीव्हीवरून अनुभवला दिव्य सोहळा
अयोध्येत राम मंदिरासाठीचे भूमिपूजन बुधवारी पार पडले आहे. भूमिपूजन सोहळय़ाचे दूरदर्शनसोबत खासगी वाहिन्या तसेच अन्य माध्यमांद्वारे थेट प्रसारण देशविदेशात करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात रामलल्लाची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील के. पराशरन यांनी कुटुंबीयांसह भूमिपूजन सोहळा टीव्हीवरूनच पाहिला आहे. टीव्हीवर सोहळा पाहिल्यावर पराशरन हे अत्यंत आनंदी दिसून आले आहेत. भाजपचे महासचिव बी.एल. संतोष यांनी घरात टीव्ही पाहतानाचे पराशरन यांचे छायाचित्र ट्विटरवर प्रसारित केले आहे.
कोरोना संकटामुळे भूमिपूजन सोहळय़ात सामील होण्याचे निमंत्रण निवडक व्यक्तींनाच देण्यात आले होते. निमंत्रण देताना संबंधित व्यक्तीचे वय विचारात घेण्यात आले होते. पराशरन हे 92 वर्षीय असल्याने त्यांना निमंत्रणपत्रिका पाठविण्यात आली नव्हती. तसेच भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनाही कोरोना संकटामुळे सोहळय़ात प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही. परंतु या महनीयांसह सर्व भाविकांना भूमिपूजन कार्यक्रम अनुभवता यावा याकरता दूरदर्शनवर थेट प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती.
देवतांचे वकील अशी ओळख
के. पराशरन यांना ‘देवतांचे वकील’ अशी ओळख प्राप्त झाली आहे. ग्रेटर कैलास येथील त्यांच्या निवासस्थानी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे अधिकृत कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. भारताचे ऍटर्नी जनरल राहिलेल्या पराशरन यांनी अयोध्या रामजन्मभूमी संबंधीच्या खटल्यात हिंदू पक्षकारांतर्फे युक्तिवाद मांडला होता. तामिळनाडूच्या श्रीरंगम येथे 9 ऑक्टोबर 1927 रोजी जन्मलेले पराशरन हे राज्यसभा खासदार देखील होते.
अमेरिकेतही भारतीयांच्या आनंदाला उधाण
अयोध्येत ऐतिहासिक राम मंदिराच्या उभारणीस प्रारंभ झाल्यावर अमेरिकेतील भारतीय वंशीयांनी दिवे पेटवून आनंद व्यक्त केला आहे. अमेरिकेत हिंदू समुदायाच्या विविध समुहांनी सोहळय़ाचे महत्त्व अधोरेखित करत अनेक ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. वॉशिंग्टनमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी चित्रफेरी आयोजित केली आहे. तर उर्वरित भारतीयांनी घरात दीप प्रज्ज्वलित करत आनंद व्यक्त केला आहे.
सर्व भारतीय, विशेषकरून हिंदू, जैन आणि भगवान रामाची पूजा करणाऱया सर्व लोकांना अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या ऐतिहासिक दिनाच्या शुभेच्छा असे उद्गार कॅलिफोर्नियातील भारतीय समुदायाचे नेते अजय जैन भुटोरिया यांनी काढले आहेत.
स्वतःच्या घरांमध्ये पूजा करून, दिवे पेटवून आनंद व्यक्त करत आहेत. अनेक लोकांसाठी हा क्षण दिवाळीसारखाच आहे. भारतीयांदरम्यान प्रचंड उत्साह असल्याचे समुदायाने पत्रक प्रसिद्ध करत म्हटले आहे. कॅनडात ब्रँपटन शहराचे महापौर पॅट्रिक ब्राउन यांनी भूमिपूजन सोहळय़ानिमित्त हिंदू समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत. पवित्रस्थळावर मंदिर उभारणीच्या शुभेच्छा, असे उद्गार ब्राउन यांनी काढले आहेत.
ऐतिहासिक घटनेचे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांकडून वृत्तांकन
अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळय़ाची दखल जगभरातील प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. सीएनए, द गार्डियन, बीबीसी, अल जजीरा आणि डॉन या प्रसारमाध्यमांनी सोहळय़ाचे विशेष वृत्तांकन केले आहे. कोरोना संकट असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर उभारणीसाठी भूमिपूजन केल्याचे सीएनएनने म्हटले आहे. तर राम मंदिराचा शिलान्यास प्रत्यक्षात बदलत्या भारताचा शिलान्यास असल्याचा दावा द डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राने केला आहे.
सीएनएन वाहिनी
मोदींनी हिंदूधर्मीयांच्या सर्वात पवित्रस्थळी राम मंदिराचे भूमिपूजन केले आहे. हे ठिकाण कित्येक वर्षांपासून हिंदू आणि मुस्लिमांमधील वादाचे मूळ कारण ठरले होते. भारतात सलग 5 दिवसांपासून 50 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित सापडत असताना बुधवारी भूमिपूजनाचा सोहळा पार पडला आहे. गृहमंत्री अमित शाह आणि अयोध्येत मंदिराच्या पुजाऱयासह 4 सुरक्षारक्षकांनाही लागण झाल्याचे सीएनएनने स्वतःच्या वृत्तात नमूद केले आहे.
एबीसी न्यूज
कोरोना महामारीमुळे सोहळय़ाला मोठी गर्दी झाली नसली तरीही भारतातील हिंदू आनंदी आहेत. पंतप्रधान मोदींनी राममंदिराचे भूमिपूजन केले आहे. मंदिर उभारणीकरता 3 ते 3.5 वर्षे लागणार आहेत. हे जगातील सर्वात भव्य मंदिरांपैकी एक ठरणार असल्याचे एबीसी न्यूजने नमूद केले आहे.
बीबीसी
बीबीसीने भूमिपूजनासह राम मंदिर आणि बाबरी मशिद वादाचा उल्लेख केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडय़ामुळे राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. तर मुस्लिमांना मशिदीसाठी स्वतंत्र जागा देण्यात आल्याचे बीबीसीने सांगितले.
द गार्डियन
अयोध्येत 3 महिन्यापूर्वीच दिवाळीचा सण अवतरला आहे. शहरात राम मंदिराची कोनशिला ठेवली जात आहे. दशकांपासून हा भारतीय इतिहासाचा सर्वात भावनात्मक आणि विभाजनकारी मुद्दा राहिला आहे. भगवान राम हिंदूंना सर्वात पुज्य आहेत. त्यांचे मंदिर कोटय़वधी हिंदूंसाठी गर्वाचा क्षण असल्याचे द गार्डियन वृत्तपत्राने म्हटले आहे.