1.3 चौरस किलोमीटरच्या बेटावरून होता वाद ः
वृत्तसंस्था/ कोपेनहेगन
डेन्मार्क आणि कॅनडा यांच्यादरम्यान आर्क्टिकमध्ये एका निर्जन आणि ओसाड बेटावरून 49 वर्षे जुना वाद संपुष्टात आला आहे. दोन्ही देश या छोटय़ा बेटाच्या विभागणीवर सहमत झाले आहेत. करारानुसार या 1.3 चौरस किलोमीटरच्या हॅन्स बेटावर एका सीमा रेषा निर्माण केली जाणार आहे. बेट डेन्मार्कच्या निमस्वायत्त क्षेत्र ग्रीनलँडच्या उत्तर-पश्चिम किनाऱयावर आणि कॅनडाच्या एलेस्मेयर बेटादरम्यान समुद्रीमार्गावर आहे. हॅन्स बेटावर खनिजांचा कुठलाही भांडार नाही.
सीमा वाद व्यवहार्य आणि शांततापूर्ण मार्गाने सोडविणे शक्य असल्याचे हा करार दाखवून देतो. जगात युद्ध आणि अशांततेदरम्यान हा महत्त्वाचा संकेत असल्याचे उद्गार डेन्मार्कचे विदेशमंत्री जेप्पे कोफोड यांनी काढले आहेत. कॅनडा आणि डेन्मार्क 1973 मध्ये नारेस सामुद्रधुनीच्या माध्यमातून ग्रीनलँड अन् कॅनडादरम्यान एक सीमा निर्माण करण्यासाठी सहमत झाले होते. परंतु हॅन्स बेटावर कुणाचा अधिकार असेल यावर त्यांच्यात सहमती झाली नव्हती. अखेरच मालकीच्या प्रश्नावर दोन्ही देशांनी चर्चा करत यशस्वी तोडगा काढला आहे.
दोन्ही देशांमधील वादाला प्रसारमाध्यमांनी ‘व्हिस्की युद्ध’ असे नाव दिले होते. दोन्ही देशांमधील अंतर्गत प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हा करार लागू होणार आहे. डेन्मार्कमध्ये प्रथम संसदेची करारासाठी सहमती मिळवावी लागणार आहे.
हा कॅनडा अन् डेन्मार्कसाठी विजय आहे. क्षेत्रीय वाद कशाप्रकारे सोडविता येतात हे आम्ही अन्य देशांना दाखवून देत आहोत. आमच्याकडे वाद सोडविण्याची सर्वात चांगली पद्धत असल्याचे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना दाखवून देत आहोत असे उद्गार कॅनडाचे विदेशमंत्री मेलानी जोली यांनी काढले आहेत.
दोन्ही देशांनी या बेटानजीक स्वतःच्या युद्धनौका तैनात केल्या होत्या, परंतु प्रत्यक्ष युद्धाचा धोका कधीच निर्माण झाला नव्हता. दोन्ही देशांनी शांततापूर्ण मार्गाने समस्येवर तोडगा काढण्याचा संकल्प घेतला होता. दोन्ही देशांमधील चर्चा 2005 साली सुरू झाली होती. या करारामुळे आता कॅनडाची सीमा आता अमेरिकेसोबत आणखीन एका देशाला लागून असणार आहे. हे बेटाच्या चहुबाजूला असलेल्या सागरी सीमा अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे कॅनडाच्या आर्क्टिक बेटांसाठीचा मार्ग खुला होऊ शकतो आणि पूर्व युरोपसाठीचे सागरी अंतर यामुळे कमी होऊ शकते.









