सिक्कीममधील दुर्घटनेने हाहाकार : आठ जणांचा मृत्यू : तिस्ता नदीला महापूर
वृत्तसंस्था/ गंगटोक, नवी दिल्ली
सिक्कीममध्ये अचानक ढगफुटी झाल्याने हाहाकार निर्माण झाला आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर कोसळलेल्या संततधार पावसामुळे तीस्ता नदीला महापूर आल्यामुळे भारतीय लष्कराच्या 23 जवानांसह 49 जण बेपत्ता झाले आहेत. प्रशासनाकडून या भागात युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु आहे. बुधवारी दिवसभरही सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने प्रशासानाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बचावकार्यावेळी 8 जणांचे मृतदेह सापडल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली.

सिक्कीमच्या अनेक भागात पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग 10 च्या काही भागांचेही अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामुळे गंगटोकचा देशाच्या इतर भागांशी संपर्क तुटला आहे. मंगळवारी रात्री उशिरा उत्तर सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे तीस्ता नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे नदीलगतच्या अनेक सखल भागात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्याने अनेक भागात पाणी शिरले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने 23 जवान बेपत्ता असल्याचीही माहिती आहे. तसेच लष्करी वाहने आणि त्यांचे साहित्यही वाहून गेले आहे. बेपत्ता जवानांचा शोध सुरू आहे. गोलिटार आणि सिंगटाम प्रदेशातून पाच मृतदेह सापडल्याचे गंगटोकचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) महेंद्र छेत्री यांनी सांगितले. तर 23 लष्करी जवानांव्यतिरिक्त 26 नागरिकही बेपत्ता असून 18 जखमींसह 45 जणांना वाचवण्यात यश आल्याचे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले.
रस्ते वाहतूक यंत्रणा कोलमडली

तीस्ता नदीच्या जोरदार प्रवाहामुळे राष्ट्रीय महामार्गाचा मोठा भाग खचला आहे. बुधवारी तीस्ता नदीचे भीषण रूप स्थानिक लोकांनी आपल्या पॅमेऱ्यात टिपले. तीस्ता नदीच्या जोरदार प्रवाहामुळे अनेक पूल आणि अनेक महत्त्वाचे रस्ते नदीच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेले. गंगटोकपासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या सिंगटम शहरातील तीस्ता नदीच्या इंद्रेणी पुलाला अचानक पुराचा तडाखा बसला. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास बलुतार गावाचा लिंक पूलही वाहून गेला. सिंगताम येथील नदीपात्राजवळील अनेक घरांतील लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. गंगटोकच्या उत्तरेला सुमारे 90 किमी अंतरावर असलेल्या तीस्ता धरणाजवळील चुंगथांग शहरातील रहिवाशांनाही वाचवण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, उत्तर सिक्कीममधील सिंगटाम ते चुंगथांगला जोडणाऱ्या डिक्चू आणि तुंग शहरातील दोन पुलांचेही नुकसान झाले आहे.
अलर्ट जारी
सिक्कीमच्या बहुतांश भागात मंगळवार रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्याच्या उत्तर आणि पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये फ्लॅश अलर्ट जारी करण्यात आला आहे. गझोल्डोबा, डोमोहनी, मेखलीगंज आणि घिश या सखल भागांना याचा फटका बसू शकतो, असा इशारा जारी करण्यात आला आहे. तीस्ता नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांनाही त्यांच्या सुरक्षिततेसाठी घरे सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या इशाऱ्यानुसार सर्वांना सतर्क राहण्याचा आणि तीस्ता नदीच्या पात्रात प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुराच्या विळख्यात अडकलेल्या परिसरातील स्थानिक लोकांना वाचवण्यात आणि बाहेर काढण्यात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) व्यस्त आहे.
पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांची आढावा चर्चा
ढगफुटीच्या भीषण नैसर्गिक आपत्तीनंतर मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी सिंगतामला भेट दिली. या अचानक आलेल्या पुरात सार्वजनिक मालमत्तेचे नक्कीच मोठे नुकसान झाले आहे. काही लोक बेपत्ता झाले असून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री तमांग यांच्याशी चर्चा करत परिस्थितीचा आढावा घेत केंद्रीय यंत्रणांकडून मदत पुरविण्याची तयारी दर्शवली आहे.
पाच पूल कोसळले, दोन धरणांचे नुकसान

या आपत्तीमुळे पाच पूल कोसळले असून त्यात मंगतम तलाव पूल, सिंघतामचा इंद्राणी पूल, शिरवाणी पूल, लिंगी पूल आणि जंगू पूल यांचा समावेश आहे. तसेच चुंगठाण येथील 1,200 मेगावॅटच्या तीस्ता एनर्जी धरणाच्या स्थितीवरही परिणाम झाला आहे. सिंघताममध्ये एनएचपीसी धरणाचेही नुकसान झाले आहे.
सिक्कीममध्ये कुठे झाली ढगफुटी?
मंगळवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजण्याच्या सुमारास उत्तर सिक्कीममधील ल्होनक तलाव येथे ढग फुटल्याची घटना घडली. या ढगफुटीमुळे लाचेन खोऱ्यातून जाणाऱ्या तीस्ता नदीला अचानक पूर आला. याचदरम्यान धरणातून पाणी सोडल्याने परिस्थिती आणखी बिकट झाल्याचे बुधवारी सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एसएसडीएमए) अधिकाऱ्याने सांगितले. बचाव आणि मदत कार्यादरम्यान सिंगताम येथून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.









