जालंधर
75 वर्षीय सत्यादेवी यांचा संघर्ष सर्वसामान्य महिलांसाठी उदाहरण ठरले आहे. त्यांचे पती मंगल सिंग यांना 1971 मध्ये पाकिस्तानी सैन्याने अटक केली होती. त्यावेळी 27 वर्षांचे असलेले मंगल सिंग हे 3 आणि 2 वर्षाच्या दोन मुलांचे पिता होते. तेव्हापासून सत्या यांनी पतीच्या प्रतीक्षेत अनेक दशके व्यतित केली आहेत. भारत सरकारला अनेक पत्रे पाठविल्याच्या सुमारे 8 वर्षांनी त्यांचे प्रयत्न फलदायी ठरले आहेत. 49 वर्षांच्या कालखंडानंतर राष्ट्रपती कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या पत्रात मंगल सिंग जिवंत असल्याची माहिती देण्यात आली आहे. मंगल हे पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगात कैद आहेत. पाकिस्तान सरकारशी चर्चा करून त्यांच्या मुक्ततेच्या प्रयत्नांना वेग देण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद आहे.
1971 च्या युद्धावेळी मंगल यांना बांगलादेशात पाठविण्यात आले होते. तेथे नौका बुडून झालेल्या दुर्घटनेत मंगल सिंग समवेत सर्व सैनिक मृत्युमुखी पडल्याचे कळविण्यात आले होते. पण 1972 मध्ये रावळपिंडी रेडिओवरून मंगल सिंग यांनी आपण ठीक असल्याचा संदेश दिला होता. तेव्हापासून त्यांच्या वापसीची प्रतीक्षा कुटुंबीयांकडून करण्यात येत होती. पाकिस्तानच्या तुरुंगात 83 सैनिक कैद असून यात मंगल यांचाही समावेश आहे.









