ई-फेरफार, ई-चावडी प्रकल्पासाठी इंटरनेट वापरासाठी निधी मंजूर
कोल्हापूर/प्रवीण देसाई
ई-फेरफार व ई-चावडी प्रकल्प राबविण्यासाठी इंटरनेटच्या डेटा कार्ड वापरासाठी राज्य सरकारकडून जिह्यातील 528 तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना सुमारे 47 लाख 52 हजारांचा निधी मंजूर झाला आहे. प्रत्येकी 750 ऊपये दरमहा या प्रमाणे एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधितील ही रक्कम आहे. लवकरच या रक्कमेचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित मंडल अधिकारी व तलाठ्यांना वितरण होणार आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम राज्यात ई-महभुमी या नावाने राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत ई-चावडी व ई-फेरफार प्रकल्प राज्यभरात राबविण्यात येत आहेत. याच्या अंमलबजावणीसाठी मंडल अधिकारी व तलाठी यांच्याकडील लॅपटॉप स्टेट डेटा सेंटरवरील सर्व्हरबरोबर जोडणी करण्यासाठी डेटा कार्डद्वारे कनेक्टिव्हीटी करणे अनिवार्य आहे. या सर्व्हरबरोबर जोडणी करण्यासाठी तसेच ई-चावडी व ई-फेरफार आज्ञावलीमध्ये एस.एम.एस. वापरासाठी इंटरनेट डाटा कार्डकरीता दर महिन्याला 750 ऊपये देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिह्यातील 528 मंडल अधिकारी व तलाठी यांच्यासाठी एप्रिल 2022 ते मार्च 2023 या वर्षासाठी 47 लाख 52 हजारांचा निधी मंजूर झाला आहे. ही रक्कम लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित तहसीलदार कार्यालयांना वितरित केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित मंडल अधिकारी व तलाठी यांना ही रक्कम वितरित होईल.
राज्यासाठी 13 कोटी 96 लाख 80 हजार मंजूर
तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना इंटरनेट डेटा वापरासाठी राज्याकरिता 13 कोटी 96 लाख 80 हजार ऊपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये प्रमुख जिह्यांना मंजुर रक्कम अशी, पुणे जिह्यातील 707 मंडल अधिकारी, तलाठ्यांसाठी 63 लाख 63 हजार ऊपये, सातारा जिह्यातील 668 जणांसाठी 60 लाख 12 हजार ऊपये, सांगली जिह्यातील 448 जणांसाठी 40 लाख 32 हजार ऊपये, सोलापूर जिह्यातील 687 जणांसाठी 61 लाख 83 हजार ऊपये, नाशिक जिह्यातील 828 जणांसाठी 74 लाख 52 हजार ऊपये, अहमदनगर जिह्यातील 680 जणांसाठी 61 लाख 20 हजार ऊपये, मुंबई उपनगर जिह्यातील 50 जणांसाठी 43 लाख 2000 ऊपये, ठाणे जिह्यातील 254 जणांसाठी 22 लाख 86 हजार ऊपये, औरंगाबाद जिह्यातील 575 जणांसाठी 51 लाख 75 हजार ऊपये, अमरावती जिह्यातील 633 जणांसाठी 56 लाख 97 हजार ऊपये, नागपूर जिह्यातील 585 जणांसाठी 52 लाख 65 हजार ऊपये मंजूर झाले आहेत.









