बहुमजली इमारतींवर येणार बंधणे : ना हरकत प्रमाणपत्राची सक्ती
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी प्रस्ताव केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. विमानतळाला आणखी 48.72 एकर जमिनीची आवश्यकता आहे. शिंदोळी, मावीनकट्टी व सांबरा या गावांमधील जमिनीच्या भू-संपादनासाठी जोरदार हालचाली सुरू असल्याने खळबळ माजली आहे. यामुळे अनेक इमारती व घरांचा समावेश करण्यास नागरिकांचा विरोध वाढत आहे.
नुकतीच बेळगाव विमानतळाच्या सल्लागार समितीची बैठक खासदार मंगला अंगडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत धावपट्टीची वाढवावी लागणारी लांबी, भू-संपादनाची प्रक्रिया, जागेची गरज या विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर महादेवनगर येथील परिसराला भेट देऊन या समितीने अहवाल विमानतळ प्राधिकरणाला पाठविला आहे. त्यामुळे भू-संपादन झाल्यास अनेकांची घरे जाणार असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
महादेवनगर येथील 21 एकर जागेची मागणी
विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी एकूण 48.72 एकर जागेची आवश्यकता आहे. शिंदोळी व मावीनकट्टी गावच्या परिसरात लायटिंग व्यवस्थेसाठी जागेची मागणी विमानतळाच्यावतीने केली आहे. तर महादेवनगर व परिसरातील 21 एकर जागा विमानतळाला देण्याच्या मागणीचे पत्र विमानतळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. सध्या महादेवनगर परिसरात रहिवासी वसाहत असल्याने भू-संपादन केल्यास त्यांच्या वास्तव्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
महादेवनगर रस्ता करणार बंद
सांबरा येथील मुख्य मार्गापासून विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर महादेवनगरचा काही भाग येतो. या परिसरात रहिवासी वसाहत असल्याने नागरिकांची व वाहनांची वर्दळ असते. विमानतळावरून निघालेली व येणारी वाहने भरधाव वेगाने येत असतात. त्यामुळे वारंवार अपघात घडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे महादेवनगर परिसरातील विमानतळाच्या दिशेने असणारा रस्ता बंद करून इतर दिशेने यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने खासदार मंगला अंगडी यांच्याशी चर्चा करण्यात आली.
बहुमजली इमारतींवर बंधणे
विमानतळाची धावपट्टी वाढविली जाणार असल्याने भविष्यात मोठी विमाने उतरण्यासाठी तयारी केली जात आहे. परंतु विमानतळाच्या रेड झोनमध्ये विनापरवाना बांधकाम सुरू आहे. यातील उंच इमारती विमान उ•ाण करताना अडचणीच्या ठरत असल्याने यापुढे विमानतळाच्या 5 कि. मी. परिघातील इमारतींच्या बांधकामासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सांबरा, शिंदोळी, निलजी, मुतगा, बाळेकुंद्री खुर्द, पंत बाळेकुंद्री, मोदगा, मावीनकट्टी, होनिहाळ, बसरीकट्टी या गावच्या परिसरातील इमारती बांधकामावर मर्यादा येणार आहेत.
आसपासच्या परिसरातील जागेची मागणी
बेळगाव विमानतळाचे विस्तारीकरण केले जाणार असल्याने 48 एकर जागेची आवश्यकता आहे. शिंदोळी, मावीनकट्टी, महादेवनगर व आसपासच्या परिसरातील जागेची मागणी सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. विमानतळ प्रवेशद्वार परिसरात गावातील रस्ता येत असल्याने अपघात होत असून, तो बंद करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
– राजेशकुमार मौर्य (विमानतळ संचालक)









