नाकात शिंपडता येणारा स्प्रे लवकरच बाजारात : ब्रिटनमध्ये विकसित
ब्रिटनमध्ये लवकरच अँटी-कोविड नेजल स्प्रे बाजारात उपलब्ध केला जाऊ शकतो. या स्प्रेच्या मदतीने नाकापर्यंत औषध पोहोचविले जाणार असून ते 48 तासांपर्यंत माणसाला कोरोनापासून वाचविणार आहे. कोरोनाची मानवी पेशींशी जोडून घेण्याची क्षमता कमकुवत करणाऱया रसायनाचा स्प्रेमध्ये वापर करण्यात आला आहे.

स्प्रेचा वापर अतिजोखीम क्षेत्रातील लोकांवर केला जाऊ शकतो, आरोग्य कर्मचारी, विमानात किंवा वर्गात याचा वापर होऊ शकतो अशी माहिती या प्रकल्पावर काम करणाऱया ब्रिटनच्या बर्मिंगहॅम विद्यापीठाने दिली आहे.
अँटी-कोविड स्प्रेचे कार्यस्वरुप
स्प्रेमध्ये कॅरेगिनेन आणि गॅलेन यासारख्या रसायनांचा वापर करण्यात आल्याने तो दाट होतो. ही रसायने माणसांसाठी सुरक्षित असून याचा वापर करण्याची अनुमती मिळाल्याचाही दावा करण्यात आला आहे. या स्प्रेमध्ये सर्वसाधारपणे खाद्य आणि औषधांमध्ये वापर होणाऱया रसायनांचा सामवेश करण्यात आला आहे. गॅलन रसायन नाकात पोहोचताच एक आवरण तयार करते. आवरण तयार झाल्यावर कोरोना विषाणू नाकात शिरल्यास हे आवरण विषाणूवर पोहोचून शिंक किंवा एखाद्या झटक्याद्वारे नाकातून त्याला बाहेर फेकते. अन्यथा माणूस हा विषाणू गिळतो, परंतु शरीराला यातून कुठलेच नुकसान होत नाही अशी माहिती या स्प्रे विषयक संशोधनाशी संबंधित डॉ. रिचर्ड मोएक्स यांनी दिली आहे.
स्प्रेनंतरही दिशानिर्देशांचे पालन
स्प्रे केल्यावरही सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि हँडवॉश करण्याच्या कोविड दिशानिर्देशांचे पालन करावे लागणार आहे. विषाणू फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यावरच कोरोनाची लक्षणे दिसू लागतात. परंतु नवा स्प्रे विषाणूला फुफ्फुसांपर्यंत पोहोचू देणार नसल्याचे डॉ. सिमोन क्लार्क यांनी म्हटले आहे. हा स्प्रे संक्रमण रोखण्याचे काम करणार असला तरीही कोविड दिशानिर्देशांचे पालन करावे लागणार आहे, कारण हा विषाणू तोंड किंवा डोळय़ांद्वारे शरीरात प्रवेश करू शकतो.









