शिराळा :
शिराळा तालुक्यात यावर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात व जूनच्या पुर्वार्धात मान्सूनपूर्व व मान्यूनोत्तर पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील ४९ पाझर तलावाच्च्या पाणलोट क्षेत्रामध्ये मौसमीपूर्व मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली असून, काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने जून महिन्याच्या उत्तरारार्धात ४९ पैकी ४७ पाझर तलावामध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रवीण तेली यांनी दिली.
४७ पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्यामधून पाणी बाहेर पडले आहे. सर्व ओढे, नाले भरून वाहत असल्यामुळे ११ गेटेड सिमेंट बंधारे तुडुंब भरले आहेत. तलावातील पाणीसाठा वाढल्याने परिसरात सिंचन विहिरी, व कुपनलिकांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. याचा लाभ अप्रत्यक्ष सिंचनाद्वारे शेतक्रयांना रब्बी हंगामा करता होणार आहे.
तसेच पाझर तलावांच्या बुडीत क्षेत्रात व खालील बाजूच्या भागामध्ये असणाऱ्या पाणी पुरवठा विहिरीमध्ये नैसर्गिक पाझरामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याचा पाणी टंचाई भेडसावणाऱ्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी लाभ होणार आहे. करमाळेसाठी पिण्याच्या पाण्यासाठी, नंबर १ च्या तलावातून पाणी विहिरीत घेतल्यामुळे, सध्या करमाळे तलावात अंदाजे ४० ते ५० टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. पाचुंब्री तलावामध्ये सध्या २५ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील ४७ पाझर तलाव भरले आहेत. जून महिन्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याची काही वर्षातील पहिलीच वेळ आहे.








