दापोली :
रत्नागिरी जिह्यात विशेषत: कोकण किनारपट्टीवर कासव संवर्धन मोहिमेला कासव मित्रांच्या सहकार्यामुळे बळ मिळत आहे. जिह्यात 23 समुद्रकिनाऱ्यांवर 46 कासव मित्र ही मोहीम अधिक पारदर्शकपणे राबवण्यासाठी कांदळवन विभागाशी समन्वय साधून अहोरात्र झटत आहेत.
या मोहिमेतील कासव मित्रांच्या यशस्वी सहभागामुळे जिह्यात कासवांची घरटी वाढली आहेत. समुद्र किनारपट्टीवर तासन्तास पायी चालत ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्यांचा शोध घेणे, त्या घरट्यात अंडी संरक्षित करणे, अंड्यांची चोरी होऊ नये, यासाठी लक्ष ठेवणे यासह अन्य धोक्यांपासून घरट्यांचे रक्षण करण्याचे कासव मित्र करतात.
ऑलिव्ह रिडले कासवांचे महत्व आणि त्यांचे रक्षण या बाबत कासव मित्र कांदळवन विभागाच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती करत असून कासव महोत्सवासारखे अभिनव उपक्रम राबवून या मोहिमेला अधिक बळकटी देण्याचे काम दरवर्षी करण्यात येते. कांदळवन व कासव मित्रांच्या प्रयत्नांना यश मिळून यावर्षी 1 हजार 417 घरटी सापडून 62 हजार 758 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. कांदळवन व कासव मित्रांच्या मदतीमुळे समुद्री कासव तथा ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची संख्या वाढत असल्याचे कांदळवन विभागाकडून सांगण्यात आले. या कासव मित्रांना 6 महिने काम असते आणि त्यांना मानधन दिले जाते. शिवाय या कासव मित्रांची कार्यशाळा घेवून कासवांसंदर्भात माहिती दिली जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
- मुख्य समुद्रकिनाऱ्यांवर असलेल्या कासव मित्रांची संख्या
गावखडी 2, गणेशगुळे 2, वेत्ये 2, माडबन 2, लाडघर 2, दाभोळ 2, कोळथरे 2, केळशी 2, आंजर्ले 2, मुरुड 2, कर्दे 2, गुहागर 7 तवसाळ 2, रोहिले 2, वेळास 2, मालगुंड 1, गणपतीपुळे 1, भाट्यो 2, आडे 1, काळबादेवी 1, आंबोळगड 2, अणसुरे पंगेरेवाडी 1, जैतापूर 1.








