पुणे / वार्ताहर :
परदेशात कांदा पाठविण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाची 46 लाख 33 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात कर्नाटकातील दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिध्दाप्पा ए. एल. एस भंडारी आणि गजेंद्र सिध्दप्पा (दोघे रा. कर्नाटक) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. स्वप्नील भगवान बेल्हेकर (वय 31, रा. दत्तनगर, नऱ्हे, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिध्दाप्पा भंडारी व गजेंद्र सिध्दाप्पा यांची तक्रारदार स्वप्नील बेल्हेकर यांच्याशी व्यवसायाच्या निमित्ताने ओळख झाली होती. तक्रारदार हे पुण्यातील कांद्याचे व्यापारी असून आरोपींनी ते कर्नाटकातील कांद्याचे मोठे व्यापारी असल्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तक्रारदार बेल्हेकर यांना परदेशात मोठया प्रमाणात कांदा पाठविल्यास चांगल्याप्रकारे परतावा मिळेल, असे अमिष आरोपींनी दाखवले. त्यानुसार तक्रारदारांकडून वारंवार त्यांनी कांदा खरेदी केला. परंतु त्यांना कांद्याचे पैसे परत न देता 46 लाख 33 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस रसाळ पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा : पुण्यात ओशो आश्रमाबाहेर शिष्यांची निदर्शने