जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : बँक खाते सक्रिय ठेवण्याचे आवाहन : 37 लाख 72 हजार 315 लाभार्थींना होणार लाभ
प्रतिनिधी / बेळगाव
अन्नभाग्य योजनेंतर्गत राज्य सरकारने जाहीर केलेल्या तांदळाच्या बदल्यात लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येत आहे. बेळगाव जिल्ह्यात 8 लाख 29 हजार 1 लाभार्थी असून त्यांच्या बँक खात्यावर 46 कोटी 54 लाख 18 हजार 520 रुपये जमा करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. यासंबंधी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. लाभार्थींच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. संबंधितांना एसएमएसच्या माध्यमातून याची माहितीही पोहोचली आहे. त्यांनी खात्री करून घ्यावी. जर आपला मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक झाला नसेल तर तशा संबंधितांनी त्वरित आपल्या बँकेशी संपर्क साधून ई-केवायसी किंवा नवीन खाते उघडावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
जुलै 2023 पासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत व अन्नभाग्य योजनेंतर्गत दरडोई 10 किलो तांदूळ देण्याची योजना जारी करण्यात आली आहे. सध्या 5 किलो तांदूळ वाटप करण्यात येत आहे. उर्वरित 5 किलो तांदळाच्या बदल्यात त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याच्या योजनेला मुख्यमंत्र्यांनी चालना दिली आहे. जिल्ह्यात 68 हजार 637 अंत्योदय, 10 लाख 80 हजार 880 बीपीएल रेशनकार्डे असून सुमारे 37 लाख 72 हजार 315 लाभार्थींना या योजनेचा लाभ होणार आहे.
बँक खात्यावर डीबीटी जमा
अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना 35 किलो तांदूळ वितरित करण्यात येत आहे. अशा रेशनकार्डमध्ये तीन सदस्य असणाऱ्यांना डीबीटी सुविधा नाही. चार सदस्य असणाऱ्या कुटुंबाला 170 रुपये, पाच सदस्यांना 510 रुपये, सहा सदस्यांना 850 रुपये, सात सदस्यांना 1190 रुपये, याप्रमाणे सदस्य संख्येनुसार त्यांच्या बँक खात्यात डीबीटी करण्यात येणार आहे. बीपीएल कार्डधारकांना 5 किलो तांदूळ दिले जात असून अतिरिक्त तांदळाच्या बदल्यात एका सदस्याला 170 रुपये, दोन सदस्यांना 340 रुपये, तीन सदस्यांना 510 रुपये, चार सदस्यांना 680 रुपये, पाच सदस्यांना 850 रुपये, सहा सदस्यांना 1020 रुपये, सात सदस्यांना 1190 रुपये, आठ सदस्यांना 1360 रुपये असे कुटुंब प्रमुखांच्या बँक खात्यावर डीबीटी करण्यात येत आहेत.









