प्रतिनिधी / रत्नागिरी
सर्वसामान्य ग्राहकांच्या रेशनवर दुकानदाराकडूनच डल्ला मारला जात असल्याचा प्रकार साखरपा कोंडगाव येथे उघडकीला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत रेशन न मिळाल्याने हा प्रकार समोर आला. ग्राहक रणधीर शिंदे यांनी पुरवठा अधिकाऱयांकडे केलेल्या तक्रारीनुसार रेशन दुकानदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाविरोधात लढण्यासाठी सारा देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉक डाऊनच्या काळात रेशनचे धान्य हाच अनेकांना आधार ठरत असताना त्यावर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार संगमेश्वर तालुक्यातील साखरपा कोंडगाव येथे उघड झाला. रणधीर शिंदे यांच्या कार्डवर सहा कुटुंबीयांची नोंद आहे. रेशन खरेदीसाठी ते संबधीत दुकानावर गेले असता सहा व्यक्तींची नोंद असूनही केवळ दोन व्यक्तींसाठीच 6 किलो गहु आणि 4 किलो तांदूळ देण्यात आले. ऑक्टोबर 2019 ते एप्रिल 2020 पर्यत असाच प्रकार सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपल्या रेशन कार्डवर मिळणारे तब्बल 84 किलो तांदुळ, 56 किलो गहु, तीन किलो तुरडाळ आणि चार किलो चणाडाळ आपल्या कुटुंबाला मिळालीच नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. लॉक डाऊनच्या काळात प्रतिव्यक्ती धान्य देण्याच्या योजनेतून धान्य मिळाले नाही म्हणुन शिंदे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱयांकडे तक्रार केली. जिल्हा पुरवठा अधिकायांनी याची गंभीर दखल घेत रेशन दुकानदार मधुकर माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. जिवानावश्यक वस्तू कायदा कलम 3 आणि 7 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय









