अबकारी विभागाची कारवाई
बेळगाव : राकसकोपजवळ अबकारी अधिकाऱ्यांनी साडेचारशे लिटर गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. श्री विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व तालुक्यात दारूविक्री बंदीचा आदेश असताना विक्रीसाठी गोवा बनावटीची दारू आणण्यात येत होती. यावेळी ही कारवाई करण्यात आली आहे. अबकारी उपअधीक्षक रवी मुरगोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवार दि. 6 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास राकसकोप धरणाजवळ तपासणी करताना एम.एच. 09 डीपी 1174 मोटारसायकल अडविण्याचा प्रयत्न केला. मोटारसायकलस्वाराने ती तेथेच टाकून तेथून पलायन केले.
या घटनेनंतर थोड्याच वेळेत एक होंडासिटी कार राकसकोप धरणाजवळ पोहोचली. एमएच 04 पासून त्याचा क्रमांक सुरू होत होता. कारमध्ये लक्ष्मण सातेरी पाटील हा होता. यापूर्वी बेकायदा दारू विक्री प्रकरणी त्याच्यावर एफआयआर दाखल झाला होता. अबकारी अधिकाऱ्यांना पाहताच लक्ष्मणने तेथून पलायन केले. जवळच श्री विसर्जनासाठी आलेल्या गणेशभक्तांची गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत लक्ष्मण पाटीलने त्यातून पलायन केल्याचे अबकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारमधून एकूण 441 लिटर गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. होंडासिटी कार व कारला पायलट म्हणून आलेल्या मोटारसायकलस्वारावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









