सुताच्या गाठींमध्ये गुंडाळले होते अमली पदार्थ
@ अहमदाबाद / वृत्तसंस्था
गुजरातमधील पिपावाव बंदरातून 450 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. गेल्या आठवडाभरातील राज्यातील ही दुसरी मोठी कारवाई असल्याची माहिती तटरक्षक दलाकडून देण्यात आली. दहशतवादविरोधी पथक आणि महसूल गुप्तचर संचालनालय यांनी केलेल्या संयुक्त कारवाईदरम्यान पिपावाव येथे एका कंटेनरमधून हेरॉईन ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. अमली पदार्थांच्या तस्करी नेटवर्कने अधिकाऱयांना गुंगारा देण्याण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली होती. धागा हेरॉईनच्या द्रावणात भिजवला आणि नंतर तो सुकवला. त्यानंतर त्याला गाठीचा आकार देत बॅगमध्ये पॅक केला. हा पिशव्या सामान्य दोऱयाच्या गाठी असलेल्या पिशव्यांसोबत पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, तपास पथकाला संशय आल्यामुळे सर्व पिशव्यांची तपासणी केली असता तस्करांचे छुपे कारनामे उघड झाले.
जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ इराणमधून अमरेली जिह्यातील पिपावाव बंदरात आणण्यात आले होते. कंटेनरमधून सुमारे 450 कोटी रुपयांचे सुमारे 90 किलो हेरॉईन जप्त केले आहे. जप्त केलेल्या कंटनेरचे वजन सुमारे 9,780 किलोग्राम इतके आहे. 100 जम्बो पिशव्यांमधील चार संशयास्पद पिशव्यांमध्ये ड्रग्ज सापडल्याचे गुजरातचे पोलीस महासंचालक आशिष भाटिया यांनी सांगितले. धाग्याच्या मोठय़ा पिशव्या असलेले कंटेनर इराणहून पिपावाव बंदरात आले होते. याप्रकरणी एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार तपास आणि जप्ती करण्यात आल्याचे डीआरआय अधिकाऱयांनी सांगितले.









