पिण्यासाठी 60 क्युसेक पाण्याचा विसर्ग
प्रतिनिधी /संकेश्वर
राजा लखमगौडा जलाशयात बुधवारी 45.856 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अवघ्या 8 टीएमसी पाणीसाठय़ाची गरज आहे. काही दिवसांत जलाशय भरणार असल्याची माहिती अभियंता कामत यांनी दिली आहे.
गत आठवडय़ात संततधार पावसाने जलाशयातील पाणीपातळी वाढली आहे. रोहिणी, आर्द्रा, पूनर्वसू, पुष्य या नक्षत्रात पावसाने दडी मारली. त्यामुळे पिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. अश्लेषा नक्षत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. नद्यांची पाणीपातळी समाधानकारक झाली आहे. त्यामुळे पुढीलकाळात पाणीटंचाई निर्माण होणार नसल्याचे दिसत आहे.
हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी व मार्कंडेय नद्यांची पाणीपातळी समाधानकारक आहे. मार्पंडेय नदीवर असणारा शिखरचा जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. घटप्रभानदीवरील जलाशय तुडुंब भरला आहे. अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.
राजा लखमगौडा जलाशयाची पाणी क्षमता 51 टीएमसी आहे. सध्या जलाशयात 29129 क्युसेक पाण्याची आवक आहे. तर जलाशयातून 161 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जलाशयातून बेळगाव, संकेश्वर, हुक्केरीसह 25 खेडय़ांना पिण्यासाठी 60 क्युसेक पाणीपुरवठा केला जात आहे.









