29,200 प्रवाशांनी केला प्रवास : दिल्ली विमानफेरीला उत्तम प्रतिसाद
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावमधून प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेल्या दिल्ली विमानफेरीमुळे प्रवासी संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडियाने नुकतीच प्रवासी संख्या जाहीर केली. ऑक्टोबर महिन्यात तब्बल 45 टक्क्यांनी प्रवासी संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.
मागील काही महिन्यांत घटत चाललेली प्रवासी संख्या ऑक्टोबर महिन्यात मात्र वाढत गेली. 5 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या दिल्ली-बेळगाव-दिल्ली विमानफेरीमुळे प्रवाशांची संख्या कमालीची वाढू लागली आहे. सप्टेंबर महिन्यात 20,265 प्रवाशांनी प्रवास केला होता. तर ऑक्टोबरमध्ये 29,285 प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे एकाच महिन्यात 9 हजार प्रवाशांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. बेळगाव-दिल्ली विमानफेरीला 80 टक्के प्रवाशांचा प्रतिसाद आतापर्यंत मिळालेला आहे.
ऑक्टोबर महिन्यात 578 विमानांची ये-जा झाली आहे तर एक मेट्रीक टन कार्गो वाहतूक करण्यात आली आहे. दिल्ली विमानफेरीमुळे बोईंग विमान उतरत असल्याने कार्गो वाहतुकीला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे भविष्यात कार्गो वाहतूकही वाढण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात प्रवासी संख्येचा 30 हजारांचा टप्पा पार होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सध्या सुरू असलेल्या सेवा
►दिल्ली, बेंगळूर, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, नागपूर, सुरत, इंदूर, जोधपूर, जयपूर व तिरुपती.









