नियंत्रण व उपाययोजना यावर चर्चेसाठी गट समितीची तातडीने बैठक
प्रतिनिधी /काणकोण
कणकोण तालुक्यात डेंग्यू रोगाने थैमान घातले असून आतापर्यंत या तालुक्यात डेंग्यूचे 45 रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण आवळी-खोतीगाव, आगोंद, कर्वे-गावडोंगरी त्याचप्रमाणे नगरपालिका क्षेत्रात कोळंब येथे आढळले आहेत. मात्र हे सर्व रुग्ण मोरपिर्ला, बार्से या भागांतील स्थलांतरित नागरिक आहेत, अशी माहिती काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंदाचे सॅनिटरी निरीक्षक प्रणय नाईक यांनी दिली. या सर्व रुग्णांवर काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात उपचार चालू आहेत.
दरम्यान, डासांची पैदास टाळण्यासाठी पावसाळय़ात आढळणारी उघडी गटारे, कुळागरांतील उघडय़ा करवंटय़ा, शहाळय़ांचे भाग यासंबंधी चर्चा करून उपाययोजना करण्यासाठी गट पातळीवरील एक बैठक उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक आरोग्य केंद्राच्या परिषदगृहात घेण्यात आली. या समितीचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो आणि आरोग्याधिकारी डॉ. स्नेहा आमोणकर सचिव आहेत.
बाजार परिसरातील कचरा, टाकावू वस्तू. वापर न होणाऱया विहिरी, उघडय़ा पाण्याच्या टाक्या, कुंडय़ा जेथे तयार करतात ती ठिकाणे, बांधकामाच्या जागा, टाकून दिलेले टायर आणि भंगाराच्या जागा या ठिकाणी डेंग्यूचे डांस अंडी घालत असतात. अशा जागा स्वच्छ ठेवण्याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे आवाहन या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व कार्यालय प्रमुखांना उपजिल्हाधिकारी गावकर यांनी केले.
या रोगावर नियंत्रण कसे ठेवावे याबाबतीत डॉ. नवज्योत हळर्णकर यांनी मार्गदर्शन केले. मागच्या पाच वर्षांतील परिस्थिती आणि सध्याचे या रोगाचे प्रमाण यासंबंधीचा अहवाल सॅनिटरी निरीक्षक नाईक यांनी सादर केला. आरोग्य केंद्रातर्फे मलेरिया आणि अन्य रोगांसंदर्भात चालू असलेल्या उपक्रमांची आरोग्याधिकारी डॉ. आमोणकर यांनी माहिती दिली. यावेळी नगराध्यक्ष रिबेलो यांनीही या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. डॉ. दिवाकर वेळीप यांनी स्वागत केले.









