पीओएफमुळे ग्रामपंचायत करवसुलीत सुधारणा होण्याची अपेक्षा : बेकायदेशीर वसुलीला आळा बसण्याची शक्यता
बेळगाव : ग्रामपंचायत व्याप्तीतील कर वसुलीमध्ये होणारा गैरकारभार टाळण्यासाठी ई-कर वसुली प्रणाली जारी करण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला कर वसुलीसाठी पीओएफ यंत्र वितरित करण्यात येत आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ग्राम पंचायतींकडून यावर्षी 40 ते 45 कोटी कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ग्रामपंचायतींच्या व्याप्तीमध्ये मालमत्ता, व्यावसायिक, औद्योगिक, मोकळ्या जागेत जाहिरात फलक लावणे अशा प्रकारे विविध प्रकारचे कर आकारले जातात. मात्र, हा कर व्यवस्थितरीत्या संग्रहित करून ग्रामपंचायतीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत नव्हता. यामुळे करवसुलीचे प्रमाण घटले होते. यात गैरकारभारही होत असल्याने राज्य सरकारकडून नव्याने ई-करवसुली प्रणाली जारी करण्यात आली आहे. या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींची करवसुली ई-प्रणालीद्वारे होणार आहे. यामुळे आर्थिक व्यवहारात अधिक पारदर्शकता येणार आहे.
करावरच ग्रा. पं.चा कारभार चालविणे आवश्यक
ग्रामपंचायतींच्या व्याप्तीत असणाऱ्या मालमत्तांच्या व इतर करावरच ग्रामपंचायतींचा कारभार चालविणे आवश्यक आहे. मात्र, कर वसुलीत होणारी दिरंगाई याबरोबरच यामध्ये होणारा गैरकारभार त्यामुळे अपेक्षेनुसार करवसुलीचे उद्दिष्ट गाठणे अशक्य झाले होते. जिल्ह्यामध्ये 40 टक्के करवसुली ओलांडणेही अशक्य झाले आहे. यासाठीच सरकारने ई-करवसुली करण्यासाठी पीओएफ यंत्र उपलब्ध करून दिले आहे. ही प्रणाली जारी केल्यानंतर वर्षाला 40 ते 45 कोटी करवसुली होण्याची अपेक्षा अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अपेक्षेनुसार करवसुली झाल्यास ग्रामीण भागात मूलभूत सुविधा देण्यास सोयीचे होणार आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, आर्थिक सबलीकरण होणार आहे. बेकायदेशीर करवसुलीलाही आळा बसणार आहे.
मालमत्तांचे सुधारित कर जाहीर नसल्याने अडथळे
जिल्ह्यामध्ये असणाऱ्या 504 ग्रामपंचायतांच्या माध्यमातून वर्षाला 40 ते 45 कोटी रुपये करवसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, वेगवेगळ्या कारणांनी ही करवसुली केवळ 25 ते 30 कोटी रुपये होत आहे. याला अनेक कारणेही आहेत. ग्रामपंचायतींच्या व्याप्तीमध्ये असणाऱ्या मालमत्तांचे सुधारित कर दहा वर्षांपासून जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे कर वसुलीचे उद्दिष्ट गाठणे अशक्य झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यातील ग्रा.पं.चा वसूल झालेला कर
- वर्ष करवसुली कोटीमध्ये
- 2018 30.8
- 2019 28.1
- 2020 30.23
- 2021 36.1
- 2022 34.08
पीओएफ यंत्रामुळे गैरकारभार थांबणार– हर्षल भोयर, जि. पं. कार्यकारी अधिकारी
जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींना ई-करवसुलीसाठी पीओएफ यंत्र दिले आहे. करवसुली करणाऱ्या कर्मचारी व पीडीओंना याचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता येऊन होणारा गैरकारभार थांबणार आहे.









