पिरनवाडी नाक्यावर कारवाई : 20 लाखांचा ट्रक ताब्यात : चालक फरार, तेलंगणाला वाहतूक
बेळगाव : पिरनवाडी नाक्यावर रविवारी पहाटे अबकारी अधिकाऱ्यांनी 44 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. गोव्याहून हा साठा तेलंगणाला नेण्यात येत होता. कारवाईच्या वेळी ट्रकचालक फरारी झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. पिरनवाडी नाक्यावर रविवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास वाहनांची तपासणी करताना एपी 39, युजे 8600 क्रमांकाच्या आयशर ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात दारुसाठा आढळला. ट्रक अडवून पाठीमागे तपासणी सुरू असतानाच चालकाने ट्रकमधून उडी टाकून तेथून पळ काढला आहे. अप्पर अबकारी आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, सहआयुक्त फिरोज खान किल्लेदार, उपायुक्त एम. वनजाक्षी, विजय हिरेमठ आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी उपअधीक्षक रवी मुरगोड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मंजुनाथ मेळ्ळीगेरी, ज्योती कुंभार, पुष्पा गडादे, परसाप्पा तिगडी, आनंद पाटील, विनायक बोरण्णावर, बसवराज डी. आदींनी भाग घेतला होता. अधिकाऱ्यांनी आयशर ट्रकमधून 250 बॉक्स विविध कंपन्यांचा दारुसाठा जप्त केला आहे. रिकाम्या पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये दारुचे बॉक्स ठेवून त्यांची वाहतूक करण्यात येत होती. जप्त दारुची किंमत 43 लाख 93 हजार 700 रुपये तर 20 लाखांच्या ट्रकसह एकूण 63 लाख 93 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.









