फोंडा : फोंडा तालुक्यात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून ऑगस्ट महिन्यातील आकडेवारी नुसार एकूण 44 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी बहुतेक रुग्ण परप्रांतीय मजूर आहेत. मडकई आरोग्य केंद्रात सर्वाधिक 19 तर त्यानंतर बेतकी आरोग्य केंद्रात 15, फोंडा आरोग्य केंद्रात 7 तर शिरोडा आरोग्य केंद्रात 3 रुग्ण आढळून आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आली. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना आखण्याचे आदेश फोंडा तालुक्याचे उपजिल्हाधिकारी सुयश खांडेपारकर यांनी फोंडा नगरपालिका, ग्रामपंचायती व औद्योगिक आस्थापनांना दिले आहेत.
आरोग्य खात्याने डेंग्यूचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतानाच विविध माध्यमातून जागृती सुरु केली आहे. लोकवस्तीमध्ये उघड्यावर पावसाचे पाणी जास्तकाळ साचून राहिल्यास डासांची पैदास वाढत असून डेंग्यूच्या फैलावासाठी हे डास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी डासांच्या पैदासीसाठी कारणीभूत ठरणारे वातावरण घराच्या सभोवताली निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. गोवा कॅन या बिगरसरकारी संस्थेतर्फे रोलंड मार्टीन्स यांच्या पुढाकाराने फोंडा उपजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत संबंधीत खात्याच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या. बैठकीला आरोग्याधिकारी डॉ. स्मिता पार्सेकर, स्वच्छता विभागाचे मनोज नाईक व अन्य अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील विविध पंचायत क्षेत्रामध्ये खुल्या विहिरी तसेच पाण्याच्या टाक्यांची पाहणी करण्याबरोबरच जनजागृती व अन्य प्रतिबंधक उपाययोजना आखण्यासंबंधी उपक्रम राबविण्यावर चर्चा करण्यात आली.









